Lokmat Agro >शेतशिवार > ...म्हणून तुकोबांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेण्याचं आवर्जून सांगितलं, वाचा संतवाणी

...म्हणून तुकोबांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेण्याचं आवर्जून सांगितलं, वाचा संतवाणी

...So Tukoba insisted to follow the example of farmers, read Santwani | ...म्हणून तुकोबांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेण्याचं आवर्जून सांगितलं, वाचा संतवाणी

...म्हणून तुकोबांनी शेतकऱ्यांचा आदर्श घेण्याचं आवर्जून सांगितलं, वाचा संतवाणी

यासाठीच 'जवळ मोजकं असूनही आनंदी राहण्याची कला जमणाऱ्या' शेतकऱ्याकडून काय शिकलं पाहिजे, ते शिकूया.

यासाठीच 'जवळ मोजकं असूनही आनंदी राहण्याची कला जमणाऱ्या' शेतकऱ्याकडून काय शिकलं पाहिजे, ते शिकूया.

शेअर :

Join us
Join usNext

आपलं जीवन म्हणजे एक आनंदाचा लाडू असला पाहिजे. त्या आनंदाच्या लाडवामध्ये गोडीही आनंदाचीच असली पाहिजे. आणि त्याचा वर्खही हलकासाच पण आनंदाचाच असावा. असा लाडू सतत खायला मिळणे म्हणजे, जीवन सार्थकी लागल्यासारखं आहे. पण समाजात वावरताना आनंद कुठेतरी बुडून गेलेलाच जाणवतो. निस्तेज चेहरे, आपलं जीवन म्हणजे एक आनंदाचा लाडू असला पाहिजे. त्या आनंदाच्या लाडवामध्ये गोडीही आनंदाचीच असली पाहिजे. आणि त्याचा वर्खही हलकासाच पण आनंदाचाच इतरांविषयीचा मत्सर, कितीही असलं तरी कमीच असल्याचा न्यूनगंड, इतरांसोबत केलेल्या तुलनेतून आलेले नैराश्य आणि या सर्वातून निर्माण होणारा द्वेष, हे सर्व पाहता लोकांच्या जीवनातील आनंदाचा लाडूच काम-क्रोधरुपी उंदरांनी नेला की काय असं वाटतंय.

संतांनाही संसार होता. त्यांनी त्यांचा संसार तर आनंदाचा केलाच पण जगाचा ही संसार आनंदाचा व्हावा म्हणूनही प्रयत्न केला. "तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही" असं म्हणत तुकोबारायांनी आनंदाचे लाडू एकट्यात नाही खाल्ले, तर समाजालाही वाटले. दिल्याने वाढतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला असं करता येईल का हे आपण पाहिलं पाहिजे. यासाठीच 'जवळ मोजकं असूनही आनंदी राहण्याची कला जमणाऱ्या' शेतकऱ्याकडून काय शिकलं पाहिजे, ते शिकूया.

भावनिक असावं; पण, यशासाठी कर्तव्य महत्वाचं...

प्रत्येकच सजीव तसा कमीअधिक भावनिक असतोच. साहजिकच मन आहे तर भावनादेखील असणारच. माणसानं भावनिक जरूर असावं, पण भावनेच्या आहारी असू नये. कारण जीवनात यश भावनेवर नाही तर कर्तव्यावर अवलंबून असतं. म्हणून भावनेपेक्षा कर्तव्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी समस्त मानवाला यशाचा मंत्र देताना 'कुणबी' म्हणजेच शेतकऱ्याचा आदर्श घेण्याचा उपदेश दिला आहे.

"अभंगाच्या पहिल्या चारणात ते म्हणतात,
मढे झाकूनिया करिती पेरणी |
कुणबीयाचे वाणी लवलाहे ||

अंतिम संस्कारा इतकं तात्काळ काम कोणतंही नाही. पण, शेतकरी शेतातील पेरणीपूर्वीची सगळी कामे करून घेतात. आणि पावसाआधी पेरणी करण्याकरिता सज्ज होतात. नेमकं तेंव्हाच घरातल्या कुणाचा मृत्यू झाला, तर ते भावना दूर ठेवत कर्तव्याला प्राधान्य देतात. "शेतकरी घरातील प्रेत (मढं) पेरणीपुरत्या काळात झाकून ठेवतात. आधी पेरणी करतात आणि मग प्रेतावर अंतिमसंस्कार!" याला कारण आहे. अंतिम संस्काराच्या विधीचा काळ घालवताना जर पाऊस आला, तर पेरणी करणार कधी? पीक आलं नाही तर वर्षभर खाणार काय? म्हणून शेतकऱ्यांचा आदर्श घेण्याचं तुकोबांनी आवर्जून सांगितलं.

दुसऱ्या चरणात ते म्हणतात,
तयापरी करी स्वहीत आपुले |
जयासी फावले नरदेह ||

"शेतकरी करतात त्याप्रमाणे माणूस जन्म मिळालेल्या प्रत्येकानं आपलं भलं करून घेतलं पाहिजे." कारण
तिसऱ्या चरणात ते म्हणतात,
ओटीच्या परिस मुठीचे ते वाढे |
यापरी कैवाडे स्वहिताचे ||

"बी पेरताना जे दाणे ओटीत आहेत, त्यापेक्षा जे मुठीत आहेत, ते ओटीतल्यापेक्षा काही क्षण आधी अंकुरतील. असा आपल्या बाजूने विचार करून स्वहीत साधून घेतलं पाहिजे."

खरंतर ओटीतल्या आणि मुठीतल्या दाण्याच्या पेरण्यातील अंतर फार काही जास्त नाही. काही क्षणाचंच आहे. पण तेवढी बारीक काळजी देखील आपल्या भल्याविषयी घेतलीच पाहिजे, हे तुकोबारायांचं सांगणं मनाला कितीतरी भावतं! मुठीतले दाणे पेरले आणि ओटीतले घ्यायला जातानाच्या तेवढ्याच क्षणात काही वाईट घडलं तर? ओटीतले तसेच पेरायचेच राहून जातील. वेळ आपल्या हातात नाही, हे सांगताना
चौथ्या चरणात ते म्हणतात, 
नाही काळसत्ता आपुलिये हाती |
जाणते हे गुंती उगविती ||

"काळ-वेळ आपल्या हातातली गोष्ट नाही. तिच्या सत्तेपुढे कुणाचं काही चालत नाही. कोणत्या वेळेला काळाचा अचानक घाला पडेल, ते कळणारही नाही. त्यामुळे जाणकार माणसंच या गुंत्यातून आपली सोडवणूक करून घेतात."

आणि शेवटी ते म्हणतात,
तुका म्हणे पाहे आपुली सूचना |
करितो शहाणा मृत्युलोकी ||

"मी काळसत्तेच्या बाबतीत जी काही (धोक्याची) सूचना दिली आहे, ती लक्षात घेऊन जो स्वतःचं हित करून घेतो, तो या मृत्यूलोकातला सर्वात शहाणा माणूस असेल." भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे सांगताना तुकोबारायांनी काळ-वेळेचंही भान आपल्याला दिलं आहे. भावनेपेक्षा कर्तव्य आणि कर्तव्यापेक्षा वेळ काळ श्रेष्ठ, हे आपण कायम स्मरणात ठेवून यशाकडे जीवनाची वाटचाल करत राहूया. शहाणं बनत राहूया.

लेखक : ह.भ.प. विजय महाराज गवळी, छत्रपती संभाजीनगर

Web Title: ...So Tukoba insisted to follow the example of farmers, read Santwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.