Join us

Soil Health : "मातीला श्रीमंत बनवा, ती तुम्हाला श्रीमंत बनवेल" असा संदेश देणारे विश्वासराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 9:40 PM

Farmer Vishwasrao Patil : विश्वासराव पाटील हे सेंद्रीय शेतीमधील मोठे शेतकरी असून त्यांनी अनेक प्रयोग आपल्या शेतात केले आहेत.

Jalgaon farmer Vishwasrao Patil : "आपण मातीचे आरोग्य जपले तर तिच्यातून आपल्याला खूप काही मिळते. मातीची निगा आपण राखली, तिची अब्रू आपण राखली तर ती आपली अब्रू राखेल आणि मातीला श्रीमंत बनवता ती आपल्याला श्रीमंत बनवेल" असा संदेश जळगाव जिल्ह्यातील प्रगतशील सेंद्रीय शेतकरी विश्वासराव पाटील यांनी दिला. 

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी उपस्थित शेतकरी आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील दुष्काळी भागात ज्यावेळी ११ किलोमीटर अंतरावरून प्यायला पाणी यायचे त्यावेळी त्यांनी वडिलोपार्जित १२५ एकर शेती पाणीदार करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि पूर्णही केले. 

एकात्मिक, सेंद्रीय शेतीचा खरा नमुना त्यांनी आपल्या शेतात तयार केलाय. मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. खरंतर मातीमधून चांगेल उत्पादन घ्यायचे असेल तर मातीचा पोत सुधारणे गरजेचे आहे. मातीतील सेंद्रीय कर्ब वाढवणे गरजेचे आहे. मातीमध्ये जीवाणू असणे आवश्यक आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

मातीला श्रीमंत बनवणे म्हणजे काय करणे?मातीतून कोणतेही पीक चांगले उगवून येण्यासाठी मातीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर आवश्यक अन्नद्रव्ये असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुळांची वाढ होण्यासाठी माती भुसभुशीत असावी लागते. शेतीमधील पालापाचोळा आणि काडीकचरा मातीतच कुजवला पाहिजे, जेणेकरून मातीचा सेंद्रीय कर्ब वाढेल, मातीमध्ये नैसर्गिक पद्धतीने मल्चिंग (आवरण) केले पाहिजे. आपण शेतातील काडीकचरा जाळतो म्हणजे काळ्या आईचं लुगडं काढून घेतो त्यामुळे मातीला नैसर्गिक मल्चिंग खूप गरेजेचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. 

नैसर्गिक मल्चिंगच्या माध्यमातून त्यांनी केवळ १२ पाण्यावर उसाचे पीक घेतले असून इतर पिकांसाठीही ते हेच सूत्र वापरतात. नैसर्गिक पद्धतीचा वापर करून, मिश्र पिकांची लागवड करून शेती केली तर कमी पाण्यात आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो असंही ते म्हणाले. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीजळगाव