अनेक शेतकरी पिकाची लागवड करण्यासाठी आपल्या शेतीतील मातीचे परिक्षण करतात. परिक्षणाच्या अहवालानंतर मातीत लागणारे मुलद्रव्ये, खते, औषधांची मात्रा ठरली जाते. पण अनेकदा मातीचा नमुना कसा घ्यावा याची परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांकडे नसते. मातीचा नमुना घेण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा माती परिक्षणाचा अहवाल चुकीचा येऊ शकतो.
दरम्यान, माती जर डोळ्यांना वेगवेगळी दिसत असेल तर त्या भागातील मातीचा नमुना वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. काळी, मुरमाड, चुनखडी, गडद काळी आणि खडकाळयुक्त जमिनीतील मातीचा नमुना घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
नमुना घेताना घ्यावयाची काळजी
- विहिरीजवळील मातेचा नमुना घेऊ नये
- झाडाखालील मातेचा नमुना घेऊ नये
- ज्या ठिकाणी शेतातील काडीकचरा जाळलेला आहे त्या ठिकाणचा मातीचा नमुना घेऊ नये
- घराजवळील मातेचा नमुना घेऊ नये
- शेतात खत टाकल्यानंतर तीन महिन्यांच्या आधी मातीचा नमुना घेऊ नये
मातीचा नमुना घेत असताना शेतीच्या चार बाजूचा किंवा मधल्या ठिकाणचा न घेता सर्पिलाकर पद्धतीने म्हणजे झिगझॅग पद्धतीने घेतला पाहिजे. नमुना घेत असताना एक फूट किंवा तीस सेंटीमीटर खोल खड्डा खोदायचा आहे. खड्डा घेतल्यानंतर वरपासून खालीपर्यंतची मातीत तासून जमा करायची आहे.
एका एकरामध्ये चार खड्डे घ्यावेत आणि त्या खड्ड्यातील मातीचे नमुने जमा केल्यानंतर मातीचा नमुना एका ताडपत्री वर ठेवावा. त्यानंतर या मातीचे चार समान भाग करावेत. त्या चार समान भागातील तिरके दोन भाग एकत्र करा. आणि त्या मातीचे पुन्हा चार भाग करून पुन्हा त्या मातीचे तिरके दोन भाग एकत्र करून अर्धा किलो मातीचा नमुना तपासणीसाठी पाठवावा.
दरम्यान, माती प्रयोगशाळेमध्ये तपासण्यासाठी पाठवताना ती जास्तीत जास्त अर्धा किलो वजनाची असावी. वरील गोष्टींचे पालन केले तर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये असलेल्या मूलद्रव्यांचा अचूकपणे शोध घेता येतो आणि त्यानंतर पिकासाठीचे खतांचे आणि औषधांच नियोजन करता येते.