सोलापूर : बिगर शेती कर्ज थकबाकी वसुलीसाठी जर्र जर्र झालेल्या सोलापूर डीसीसी बँकेचा थेट कर्ज वाटपाचा पॅटर्न ९९ टक्क्यांपर्यंत होणाऱ्या वसुलीमुळे राज्यात 'आदर्श' ठरत आहे. विकास सोसायट्यांच्या वसुलीचा टक्का यंदा आणखीन वाढल्याने थेट कर्जासह डीसीसीची वसुली ५८ टक्के इतकी झाली आहे.
"नाबार्ड" च्या परवानगीने चार वर्षांपासून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी थेट कर्ज देणारी सोलापूर डीसीसी राज्यात एकमेव बैंक आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बिगर शेती कर्ज थकबाकी वसूल होत नसल्याने आर्थिक अडचणीत आली होती.
बँकेची पत घसरल्याने शेतकऱ्यांना विकास सोसायट्यांकडून कर्ज मिळणे बंद झाले होते. बिगर शेतीची थकबाकी संचालक भरत नव्हते. शेतकऱ्यांचे कर्ज वाटप बंद झाल्याने नाबार्डच्या शिफारशीनंतर डीसीसीवर मे २०१८ मध्ये प्रशासक आले. प्रशासक म्हणून शैलेश कोतमिरे काम करीत असताना बिगर शेती वसुलीसाठी प्रयत्न केले.
त्यात साधारण १५५ कोटी वसूल झाले. याशिवाय नागरी बँका, पगारदार नोकरांच्या पतसंस्थांचे आर्थिक व्यवहार डीसीसी बँकेत सुरू केले. त्यामुळे डीसीसीच्या ठेवीत वाढ होऊ लागली. ठेवी वाढत असल्याने शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे, मात्र विकास सोसायट्या थकबाकीत असल्याची अडचण होती.
गावोगावी कर्ज मागणारे व परतफेड करणारे शेतकरी आहेत, मात्र विकास संस्थेकडून कर्ज देता येत नव्हते. ही बाब लक्षात आल्याने कोतमिरे यांनी नाबार्डच्या परवानगीने शेतकऱ्यांना २०२१ पासून थेट कर्ज वाटप सुरू केले. थेट कर्ज वाटपाची दरवर्षीच ९९ टक्क्यांपर्यंत वसुली होत आहे. थेट कर्ज पाच लाख रुपयांपर्यंत दिले जाते.
त्यामध्ये तीन लाख रुपये बिनव्याजी तर दोन लाख रुपयाला ११ टक्के व्याज आकारले जाते. यंदा विकास सोसायट्यांची वसुली ५४ टक्के व थेट कर्जाची वसुली ९९ टक्के झाल्याने बँकेची वसुली ५८ टक्के झाली आहे. यंदा विकास सोरायट्यांची वसुली ५४ टक्के व थेट कर्जाची वसुली ९९ टक्के अशी एकूण ५८ टक्के वसुली झाली असल्याचे बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी सांगितले.
शेतकरी संख्या ९ हजारांवर■ थेट कर्ज वाटप २०२१ मध्ये सुरू केले. त्यावर्षी शेतकऱ्यांना ६० कोटी वाटप केले होते. वसुली ९९ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याने दरवर्षी शेतकरी संख्या व शेतकरी वाढत आहेत. मागील वर्षात ९ हजार शेतकऱ्यांना २६८ कोटी वाटप केले होते. त्याची ९९ टक्के वसुली झाली आहे.■ विकास सोसायट्यांच्या जून २०२० (त्या आर्थिक वर्षात) ५२३ कोटी ४०.८७ टक्के, जून २०२१ मध्ये ३५० कोटी ३१ टक्के, २०२२ मध्ये ५३३ कोटी ४०.४७ टक्के, जून २३ मध्ये ७७८ कोटी ५१.३५ टक्के तर यावर्षी जून २०२४ मध्ये ८८६ कोटी ५३ टक्के वसुली झाली आहे.■ थेट कर्ज वाटपाची जून २४ मध्ये २३७ कोटी ६८ लाख ४३ हजार रुपये वसूल करायचे होते. प्रत्यक्षात २३५ कोटी ५९ लाख ९९ टक्के वसुली झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
अडचणीतील बँकांना विकास सोसायट्यांकडून कर्ज वाटपाला अडचण येते. त्यामुळे सोलापूर डीसीसीने नाबार्डच्या परवानगीने थेट कर्ज वाटप सुरू केले. गावातील शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळू लागल्याने सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. राज्यातील अडचणीतील डीसीसी बँकांनी सोलापूरप्रमाणे थेट कर्ज वाटप करावे. - विद्याधर अनासकर, प्रशासक, राज्य बँक