सोलापूर : प्रत्येक हेलपाट्याला तहसील कार्यालयात वेगळेच कारण सांगून टाळत असल्याने रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रश्न मांडला. तरीही अनुदान मिळत नसल्याने अनुदानाचा विषय थांबविला.
बघूया आता शेवटचा प्रयत्न म्हणून मनरेगाचे सचिव नंदकुमार यांच्याकडे पत्राद्वारे गाऱ्हाणे मांडल्याचे कळमणच्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
उत्तर तहसील कार्यालयात सर्वसामान्यांचे काम होणे अशक्य असल्याचे कळमणच्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर लक्षात येते. रोपे तयार करणे, रान तयार करणे व प्रत्यक्षात तुती लागवड केल्यानंतर अनुदानासाठी हेलपाटे सुरू झालेत.
पंचायत समिती व तहसील कार्यालयात हेलपाटे मारून न्याय मिळत नसल्याने तत्कालीन रोहयो उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख यांना कळमणचे शेतकरी भेटले.
गाऱ्हाणे ऐकून देशमुख यांनी उत्तर तहसीलदारांना प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. रोहयो उपजिल्हाधिकारी देशमुख यांचा संदर्भ देत नंतर उत्तर तहसील कार्यालयात संबंधित लिपिक व तहसीलदारांना भेटल्याचे शेतकरी वैजिनाथ कांबळे यांनी सांगितले.
आता आपणास न्याय मिळत नसल्याने निवांत बसलो होतो मात्र सामाजिक संघटनांनी रोहयो सचिव नंदकुमार यांच्याकडे एकदा प्रयत्न करा असा सल्ला दिल्याने १६ जानेवारीला नंदकुमार यांना निवेदन पाठविले आहे.
नंदकुमार यांच्या आदेशानुसार तरी उत्तर तहसील शेतकऱ्यांची बिले काढणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या संदर्भात सध्या चर्चा होत असून, बिलाचा विषयाचे काय होईल असे बोलले जात आहे.
१६ शेतकरी २० एकर तुती
उत्तर तालुक्यात १८ शेतकऱ्यांनी ३० एकर तुती लागवड केली आहे. त्यामध्ये कळमण व हगलूर येथे प्रत्येकी ५ एकर, प्रतापनगर, हिरज व वडाळ्यात प्रत्येकी दोन एकर, भोगांव तीन एकर, बसवेश्वर नगर व नान्नज प्रत्येकी चार एकर तर डोणगाव येथे एक एकर तुती लागवड केली आहे. याही गावातील शेतकऱ्यांच्या अनुदानाचा विषय आहेच.
तुम्ही तरी न्याय द्या : शेतकरी
राज्याचे रोहयो सचिव नंदकुमार यांना पाठविलेल्या निवेदनात रेशीम शेती करायची म्हणून जिल्हा रेशीम कार्यालयाचे प्रशिक्षण घेतल्याचे कळमणच्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे. कार्यारंभ आदेश मिळाल्याने स्वखर्चातून रोपे तयार केली, खड्डे मारून तुतीची लागवड केली. शेड उभा करून आवश्यक रॅक तयार केले. आजपर्यंत अडीच वर्षात रेशीम विभाग, उत्तर तहसील, पंचायत समिती, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात ७० ते ८० हेलपाटे मारून कामाचा पाठपुरावा केला. तरीही अनुदानाचा एक रुपयाही मिळाला नसल्याने आम्हाला तुम्ही तरी न्याय द्यावा असे शेतकऱ्यांनी सचिव नंदकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अधिक वाचा: Peru Fal : हिवाळ्यात का खावा पेरू? काय आहेत फायदे; वाचा सविस्तर