नासीर कबीर
करमाळा : उजनी धरण पाणलोट क्षेत्र व दहिगाव उपसा सिंचन लाभक्षेत्रात शेतकरीऊस पिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहे. सध्या ३,२८० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे.
करमाळा तालुक्यात १९,२८० हेक्टर क्षेत्रावर केळीच्या बागा उभ्या आहेत. जून २०२४ पासून जानेवारी २०२५ अखेर गेल्या आठ महिन्यात तब्बल ९,५०० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे.
ऊस पिकासाठी येणारा खर्च जास्त असतो शिवाय उसाचे पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री देता येत नाही तर केळी पिकाचे पैसे लवकर मिळतात. त्यामुळे शेतकरी केळी पिकाकडे वळले आहेत.
उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र व दहिगाव उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र आता केळीचे 'आगार' म्हणून नावारूपाला आले आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी केळीला ३३ रुपये एवढा उच्चांकी दर किलोला मिळाला होता.
करमाळा तालुक्यात केळी पिकामध्ये कांदा, हरभरा, कलिंगड, खरबूज, मिरची यासारखे आंतरपिके घेतली जातात. तालुक्यातील केळीची प्रत चांगली असल्याने आखाती देशातून येथील केळीला मोठी मागणी आहे.
त्यामुळे दर ही मागील तीन ते चार वर्षापासून चांगला मिळत असल्याने शेतकरी ऊस पिकास फाटा देऊन केळी पिकाकडे वळला आहे.
करमाळा तालुक्यातील केळीला दर ही मागील तीन ते चार वर्षांपासून चांगला मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ऊस पिकास फाटा देऊन केळी पिकाकडे वळला आहे. ३३ रुपये एवढा उच्चांकी दर करमाळ्यात केळीला मिळाला.
ऊसाला अपेक्षित भाव मिळत नाही. शिवाय कारखान्याला ऊस घालवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. ऊसापेक्षा कितीतरी पटीने केळीचे पीक फायदेशीर असल्याने केळी पिकाकडे वळालो. - बाळासाहेब जगताप, पारेवाडी
ऊस हे १२ ते १६ महिन्याचे पीक आहे तर केळी दहा महिन्याचे पीक आहे. तीस महिन्यांत केळीचे तीन पिके घेतली जातात शिवाय केळीला उसापेक्षा चांगला दर मिळतो. बाजारपेठेही सहज उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी केळी पिकाकडे वळलेला आहे. सध्या लागवडही वाढल्याचे दिसून येत आहे. - देवराव चव्हाण, तालुका कृषी, अधिकारी करमाळा
अधिक वाचा: Thibak Anudan : ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा जीआर आला; महा-डीबीटीद्वारे पैसे मिळणार