नासीर कबीर
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याने केळी उत्पादनात दबदबा तयार केला आहे. केळी पिकासाठी पोषक वातावरण असल्याने या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत आहे. निर्यातक्षम केळीचे उत्पादन होत असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. करमाळा तालुक्यात दरवर्षी अडीच लाख मे. टन केळीचे उत्पादन होत असून, ८० हजार मे. टन केळी आखाती देशात निर्यात केली जाते.
निर्यातीत २५ टक्के वाटा
इराण, ओमान, दुबई यासारख्या आखाती देशांत केळीला मोठी मागणी आहे. देशभरातून दरवर्षी साधारण १६०० कंटेनर केळी तिकडे निर्यात होते. यामधील २५ टक्के केळीचा पुरवठा एकट्या करमाळा तालुक्यातून होतो. देशाला परकीय चलन मिळवून देण्यातही तालुक्यातील शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे.
केळीला १८ रुपयांचा दर
सोलापुरी केळी दर्जेदार व निर्यातक्षम असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलोला सध्या १६ ते १८ रुपये किलोचा दर मिळू लागला आहे. गतवर्षी निर्यातक्षम केळीला प्रति किलो तब्बल २५ ते २६ रुपयांचा दर मिळाला होता.परिसर बनतोय निर्यातक्षम केळीचे हब
करमाळा तालुक्यातील उजनी धरण परिसरातील कंदर, वांगी, शेटफळ, उमरड, वाशिंबे परिसराबरोबरच पूर्व भागातील वरकटणे सरपडोह, निंभोरे, देळी या गावांच्या परिसरातील शेतकरी केळी पिकाकडे वळले आहेत. करमाळा तालुक्यात वर्षभर केळीची लागवड केली जात असल्याने या परिसरातून नियमितपणे केळीचा पुरवठा होतो. त्यामुळे केळी व्यापारी नियमितपणे या ठिकाणी खरेदीसाठी येतात. यामुळे करमाळा तालुका केळी पिकासाठी हब होऊ लागला आहे.