Pune : राज्यातील साखर कारखान्यांनी सौर ऊर्जा निर्मिती करून अधिक उत्पन्न कमवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्यांनी तयार केलेली वीज सहवीजेप्रमाणे खरेदी केली जाणार असूनही राज्यभरातील साखर कारखान्यांकडून या योजनेला थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जून महिन्यामध्ये साखर आयुक्तालयाकडून यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना जारी केल्या होत्या.
एक मेगावॅटचा प्रकल्प उभा करण्यासाठी साखर कारखान्यांना साडेतीन एकर जमीन लागणार असून त्यासाठी चार कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. त्यातून कारखान्यांना १६ लाख युनिट वीज तयार होणार असून चार वर्षामध्ये या खर्चाचे पैसे वसूल करता येऊ शकतात. तर याआधी महावितरण कडून कारखान्यांना सौरउर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी परवानगी देत नव्हते.
कारखान्यांच्या सौरउर्जा प्रकल्पाला आता महाराष्ट्र ऊर्जा निर्यामक आयोगाकडून मान्यता मिळाली असून कारखान्यांना सौरउर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. तर कारखाने बिगर हंगामातही नेट मिटरिंगची सुविधा उपलब्ध करून देऊ शकणार आहेत.
साखर कारखान्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लि. (महाप्रित) सोबत सामंजस्य करार (MOU) करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या धाराशिव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने सौरऊर्जा निर्मितीत यशस्वी पाऊल टाकले आहे. परंतु इतर कारखान्यांचा तेवढा सहभाग वाढताना दिसत नाही.