सौर ऊर्जा प्रकल्प वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक
सुनील काकडे विदर्भातील वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या एकूण ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी १ हजार ४९४ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास १३ ऑगस्ट रोजी मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत २० ते १४५ मेगावॅटचे ९ प्रकल्प असून त्यातील ५ प्रकल्प एकट्या वाशिम जिल्ह्यात आहेत. ही नक्कीच चांगली बाब आहे.राज्यात हरित ऊर्जेला प्राधान्य देऊन, महानिर्मिती कंपनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. त्यानुसार, प्रोक्यूरमेंट अॅण्ड कन्स्ट्रक्शन (इपीसी) तत्त्वावर वाशिम जिल्ह्यातील मौजे दुधखेडा, पार्डी टकमोर (ता. वाशिम) आणि कंझरा (ता. मंगरुळपीर) येथे अनुक्रमे ६०, ३० आणि ४० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासह बाभूळगाव आणि सायखेडा (ता. वाशिम) येथे प्रत्येकी २० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील कचराळा येथे १४५ आणि यवतमाळ जिल्ह्यातील मंगलादेवी, पिंपरी इजारा आणि मालखेड येथे प्रत्येकी २५ मेगावॅट असे एकंदरीत ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी १ हजार ४९४.४६ कोटींच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आल्याने हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जर्मनीच्या केएफडब्ल्यू बँकेशी केला जाणार करार
वाशिमसह विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जर्मनी येथील केएफडब्ल्यू बँकेकडून २.८४ टक्के प्रतिवर्ष इतक्या स्थिर व्याजदराने कर्ज घेण्याचा करार केला जाणार आहे.१३ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्जाची परतफेड पुढील १२ वर्षात महानिर्मिती कंपनीला करावी लागणार आहे.