Join us

Solar Project : धनज येथे सौरऊर्जा प्रकल्प; कृषिपंपांना दिवसाही मिळणार वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 1:10 PM

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत दहा एकरांत या प्रकल्पाची उभारणी करण्यात अली असून यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Solar Project)

Solar Project :

अंकुश कथे

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २०१७ अंतर्गत कारंजा तालुक्यातील धनज बु, येथे सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीस मंजुरी मिळालेली आहे. आता प्रत्यक्ष या प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

तब्बल दहा एकर क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या २ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसाही वीजपुरवठा होऊ शकणार आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ दशलक्ष ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक असून, ते २२ टक्के वीज वापरतात.

सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीजपुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना' नावाची एक अभिनव योजना जून २०१७ मध्ये सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरात २ मेगावॅट ते १० मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प कृषीप्रधान उपकेंद्रापासून ५ किमी अंतरावर स्थापित केले जाणार आहेत.

याच योजनेंतर्गत धनज बु, येथे २ मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. आता या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले असून, दहा एकर क्षेत्रात या प्रकल्पाची उभारणी होत आहे.

त्यामुळे परिसरातील कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याची समस्या मिटण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होऊ शकणार आहे. धनज बु. येथे सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी सुरू आहे.

या प्रकल्पातून धनज बु. वीज उपक्रेंद्रातंर्गत येणाऱ्या अठरा गावातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्याचा हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. - विनय खळगे, कनिष्ठ अभियंता महावितरण, धनज बु

या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी धनज बु. ग्रामपंचायतच्यावतीने एकूण दहा एकर क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. भविष्यात या सौर उर्जा प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी वाढीव जागा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या सौर ऊर्जा प्रकल्पाचा धनज बु. येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. - मिलिंद मुंदे, सरपंच, धनज बु

दिवाळीपर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता

• मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत धनज बु, येथे मंजूर असलेल्या सौर उर्जा प्रकल्पार्ची उभारणी वेगात करण्यात येत आहे.

• येत्या दिवाळीपर्यंत या प्रकल्पाचे पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. 

• या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे धनज बु. सह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

• त्याचा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधार होणार आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रवीजशेतकरी