Join us

चालू गाळप हंगामातील उसासाठी सोमेश्वर कारखान्याचा दर जाहीर; मार्चपूर्वी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 10:52 IST

Sugarcane FRP 2024-25 मार्चअखेरपर्यंत हंगाम बंद होणार आहे. ऊस टंचाई असतानाही सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या सहकार्याने चांगले ऊस गाळप केले असल्याचे जगताप यांनी सांगितले.

सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील उसासाठी प्रतिटन ३,१७३ रुपये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्तापर्यंत २,८०० रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असून, उर्वरित ३७३ रुपये ३१ मार्चपूर्वी सर्व रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

एफआरपीमधील २,८०० रुपये पहिला हप्ता अदा केल्यानंतर उर्वरित ३७३ रुपयांप्रमाणे ४५ कोटी रुपये सभासदांना मिळणार आहेत. त्यामुळे सभासदांना ऐन मार्च एन्डला दिलासा मिळाला आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार (दि. २५) रोजी पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, सोमेश्वरकडूनही यापुढे एकरकमी एफआरपी देण्यात येणार आहे.

जगताप पुढे म्हणाले की, चालू गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत १२ लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून, अजून २० ते २५ हजार टन ऊस शिल्लक आहे.

मार्चअखेरपर्यंत हंगाम बंद होणार आहे. ऊस टंचाई असतानाही सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या सहकार्याने चांगले ऊस गाळप केले असल्याचे जगताप यांनी सांगितले.

अधिक वाचा: गुळ व आधारित उत्पादनातून वाढविला शेतीचा गोडवा; खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा फायदा

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीबँकउच्च न्यायालय