पावसाच्या अनियमिततेचा खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामालाही फटका बसण्याची शक्यता आहे. पाऊसच कमी असल्याने यंदा ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची तर गहू, कांदा, हरभरा आदी पिकांचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात केवळ १५ टक्केच पेरणी झाली आहे.
खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे उडीद, मूग, सोयाबीन आदी पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. काही ठिकाणी न तर पाऊस नसल्याने पेरणीच झाली नाही. पिकांची उगवण झालेल्या ठिकाणी नंतर पावसाने ओढ दिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला.
उडीद, मूग, सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन निघाले. यंदा कृषी विभागाने ४ लाख ५८ हजार हेक्टरवर रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारीचे २ लाख ६७ हजार क्षेत्र प्रस्तावित आहे. हरभरा ८८ हजार ३७६ हेक्टर, गहू ८६ हजार ४०४ हेक्टर, मका १४ हजार ११८ हेक्टर क्षेत्र जिल्ह्यात प्रस्तावित आहे.
का वाढणार ज्वारीचे क्षेत्र- यंदा बहुतांश तालुक्यात पावसाने सरासरी गाठली आहे. मात्र ओढे, नाले, नद्या पुरेशा वाहिल्या नाहीत. पाऊसही अल्प काळात धो-धो पडून गेला. त्यामुळे विहिरी, बोअरवेल आदी ठिकाणांची पाणी पातळीही वाढली नाही. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी मिळत नाही, अशा भागातील शेतकरी गहू, हरभरा, कांदा पिकाऐवजी ज्वारीला प्राधान्य देतील.- कमी पावसावर येणारे पीक अशी ज्वारीची ओळख आहे. योग्य नियोजन केल्यास ज्वारीचे उत्पादनही चांगले निघते. सिंचनाची सोय असलेल्या क्षेत्रावरही यंदा कांद्याऐवजी शेतकरी ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांनाच पसंती देण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाची रब्बी हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खते यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. शेतकयांनी खात्री करूनच बियाणांची खरेदी करावी. पक्के बिल घ्यावे. पेरणी करताना काही बियाणे शिल्लक ठेवावे. त्याचा उपयोग बियाणे उगवण्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास होतो. - सुधाकर बोराळे, अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर