Soyabean Market :
सोयाबीन हंगाम अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. अशातच बाजार समित्यांत सोयाबीनचे दर मात्र जवळपास सरासरी ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलवरच येऊन ठेपले आहेत. आज रोजी सोयाबीनची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील एकुण आवक ११ हजार ४४१ क्विंटल इतकी झाली.
त्यामुळे हंगामापूर्वीच वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयाबीन हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. या पिकावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून असते.
या पिकाच्या दराकडे शेतकऱ्यांचे सतत लक्ष असते. मागील दोन वर्षांत सोयाबीनला अपेक्षित असे दर मिळू शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर केलेला खर्चही वसूल झाला नाही.
केंद्र शासनाने गेल्यावर्षी सोयाबीनला प्रति क्विंटल ४ हजार ६०० रुपये हमीभाव घोषित केला होता. प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला त्यापेक्षा चारशे रुपये कमी दर मिळत आहेत.
आता सोयाबीन हंगाम दीड महिन्यावर आला असून, यंदाच्या हंगामासाठी शासनाने सोयाबीनला ४ हजार २९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषित केला आहे. प्रत्यक्षात बाजारात सोयाबीनला अत्यल्प दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
२.८५ लाख हेक्टरवर जिल्ह्यात सोयाबीन
यंदाही जिल्ह्यात जवळपास २ लाख ८५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. सततच्या पावसामुळे हे पीक संकटात असताना बाजार समित्यांत सोयाबीनला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
गतवर्षीच्या सोयाबीनची मोठी आवक
जिल्ह्यात मागीलवर्षी उत्पादित सोयाबीन अद्यापही अनेक शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.
आज ना उद्या दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवले होते.
आता नवा हंगाम दीड महिन्यावर असल्याने गेल्यावर्षीच्या सोयाबीनची बाजारात मोठी आवक होत आहे.
उत्पादन वाढल्यास दर आणखी घसरणार नाही ना?
* जिल्ह्यात यंदा २.८५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. सद्यःस्थितीत या पिकाची स्थिती चांगली आहे.
* अशात उत्पादन वाढल्यानंतर सोयाबीनचे दर आणखी घसरणार तर नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.
कमाल दरातील सोयाबीनचे प्रमाण कमी
जिल्ह्यातील काही बाजार समित्यात सोयाबीनला कमाल ४३०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळत आहेत.
तथापि, या दरातील सोयाबीनचे प्रमाण अत्यल्प असून, अधिकाधिक सोयाबीनची खरेदी ४ हजार २०० रुपयांपेक्षा कमीच दराने होतांना दिसून येत आहे.