Issue with soybean and cotton farming गेल्या काही वर्षांपासून नगदी पीक असलेल्या सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग पिकांवर रोगराईचा प्रकोप वाढला आहे. रोगराई थांबविण्यासाठी महागड्या औषधींच्या फवारणीचा खर्च आणि इतर खर्च यामुळे लागवडी खर्चात वाढ झाली आहे.
बाजारात सोयाबीन, कपाशीला मिळत असलेला अल्प दर यामुळे लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून कपाशी पीक पेरणीकडे पाठ फिरवल्याने सोयाबीन पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. परंतु गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टीने चांगलाच धुमाकुळ घातल्याने मुंडगाव लोहारी परिसरामधील, शेतशिवारातील खरीप सोयाबीन, कपाशी, उडीद मुंग पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके सडली आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होते की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.
साहेब, रब्बीची पेरणी कशी करावी?
यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा खर्च वसूल होणार की नाही, अशी चिंता आहे. त्यामुळे साहेब रब्बी, उन्हाळी पिकांची पेरणी कशी करावी, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन विमा भरपाई व आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.