लातूर: माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषिमंत्री असताना सोयाबीन आणि देवणी, लाल कंधारी या देशी गोवंशांचे संशोधन केंद्र लातूरला होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे संशोधन केंद्र परळी येथे होणार असल्याचे जाहीर झाले असून या निर्णयामुळे लातूरकर आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, दादा भुसे यांनी लातूरमध्ये संशोधन केंद्र उभारण्याचा विचार असल्याचं सांगितल्यामुळे लातूरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र अजित पवार आपल्या आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आणि कृषिमंत्रीपदी धनंजय मुंडे यांची वर्णी लागली. त्यानंतर हे संशोधन केंद्र परळीला होणार असल्याचे छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर झाले.
या निर्णयामुळे लातूरकर नाराज झाले असून आमचे संशोधन केंद्र कृषिमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात पळवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले कृषिमंत्री धनंजय मुंडे?
"दादा भुसे कृषी मंत्री असताना त्यांनी एका कार्यक्रमात लातूरमध्ये संशोधन केंद्र उभारण्याचा विचार असल्याचे सांगितलं होतं. पण त्याआधी अशी कुठली मागणी झाली नव्हती. सोयाबीन हे एक महत्त्वाचे पीक आहे आणि बीड हा मागास जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यात संशोधन केंद्र करण्याचा आम्ही निर्णय घेतला. या संशोधन केंद्राचा फक्त बीडच नाही तर पूर्ण राज्याला फायदा होणार आहे. त्यामुळे विरोध करण्याचे काही कारण नाही" असं स्पष्टीकरण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.