Soybean committee :
यवतमाळ : बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. यातील बहुतांश सोयाबीन मोठ्या प्रमाणात ओले आहे. असे सोयाबीन वाळू घातले जात आहे.
याच दरम्यान काल (१८ ऑक्टोबर) रोजी दुपारी पाऊस बरसल्याने सोयाबीन ओले झाले. मात्र, हे सोयाबीन व्यापाऱ्यांचे असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले.
खुल्या बाजारात सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. शेतातून काढलेले सोयाबीन थेट विक्रीला आणले जात आहे. यात २४ ते २५ टक्के ओलावा आहे.
असे सोयाबीन पोत्यात भरल्यानंतर ते खराब होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी झालेले सोयाबीन वाळत घातले आहे.
त्यात योग्य प्रमाणात कारडेपणा निर्माण झाल्यावर असे सोयाबीन भरले जाते व ते प्लान्टला पाठविले जाते. शुक्रवारी असे व्यापाऱ्यांचे सोयाबीन मोठ्या प्रमाणात बाहेर वाळविणासाठी होते.
याचदरम्यान पाऊस आला. मात्र ताडपत्र्यांची जुळवाजुळव करतांना व्यापाऱ्यांची मोठी दमछाक झाली. तसेच शेतकऱ्यांची धावपळ झाल्याचे चित्र बाजार समितीमध्ये पहायला मिळाले.
सोयाबीनचे दर घसरले
■ सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने सोयाबीनच्या खरेदीचे दर घसरले आहेत. ३ हजार ५०० ते ४ हजार ३०० रुपयापर्यंत सोयाबीनची खरेदी केली जात आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
■ खरेदी झालेले सोयाबीन प्लॅटला पोहोचविण्यासाठी ट्रक भरण्याची प्रक्रिया व्यापाऱ्यांकडून सुरू होती. याचवेळी पाऊस बरसल्याने व्यापाऱ्यांचे अनेक पोते पावसात भिजले.
नेर बाजार समितीत शेतकऱ्यांची तारांबळ
शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे ढीग लागून आहेत. शुक्रवारी दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
भर पावसात शेतकरी ताडपत्र्या घेऊन धावतानाचे चित्र होते. बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचे सोयाबीन भरून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बाजार समितीच्या कारभाराविषयी रोष व्यक्त होत आहे.
येथील बाजार समितीत व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. संचालक मंडळाचे तोंडावर बोट आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात शेतमालाची कडक उन्हात उभे राहून विक्री करावी लागते. पाऊस झाल्यास शेतमाल भिजतो.
प्रत्येक वेळचा हा अनुभव असताना बाजार समितीकडून काहीही उपाययोजना केल्या जात नाही. शेतमाल असुरक्षित राहत असल्याने शेतकऱ्यांनी अनेकदा विविध प्रकारची आंदोलने केली; परंतु बाजार समितीने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली.
शेतमाल साठविण्याचा विषय असो वा दराचा, शेतकऱ्यांनाच नुकसानाची झळ पोहोचते. मालाची आवक वाढताच दर पाडले जाते. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. आज शेतकऱ्यांना सोयाबीन केवळ ४ हजार १००- ४ हजार ३०० रुपये दरात विकावे लागत आहे,
मजुरी तोडण्यासाठी, कृषी केंद्राचे बिल देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांना अल्प दरात सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळेच त्यांची बाजार समितीत शेतमाल टाकण्यासाठी गर्दी होत आहे. व्यापारी शेडमधून शेतमाल बाहेर काढण्यास तयार नाहीत.
विशेष म्हणजे, काही व्यापाऱ्यांचे स्वतंत्र गोडाऊन आहे. गोडावून ते किरायाने देत असल्याची माहिती आहे. इकडे मात्र अतिक्रमण करतात. या सर्व प्रकारात व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचे बाजार समितीला काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी होत असतानाही बाजार समिती व्यापाऱ्यांचा माल बाहेर काढण्यास तयार नाही.