Soybean cotton :
यवतमाळ : शासकीय सोयाबीन संकलन केंद्रात सोयाबीनला चार हजार ८९२ आणि कापसासाठी प्रतिक्विंटल ७ हजार २० असे हमीभाव घोषित करण्यात आले आहेत. सद्यः स्थितीत बाजार समित्यांमध्ये नवीन हंगामातील सोयाबीन या पिकाची आवक सुरू झाली आहे.
यात बहुतांश सोयाबीन ओले आहे. शासकीय संकलन केंद्रांनी असे सोयाबीन खरेदी करण्यास नकार दिला आहे. यामुळे आठ दिवसांत सोयाबीन खरेदी निरंक राहिली आहे.
सोयाबीन आणि कापूस या शेतमालाच्या किमान आधारभूत किंमत दराने खरेदीकरिता जिल्ह्यात शासनाकडून खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे.
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ७, तर विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सात अशी एकूण १४ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
सोयाबीन विक्रीस आणताना त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने त्याची खरेदी किमान आधारभूत किमतीने होण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीस आणताना शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण हे १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याची आणि काडीकचऱ्याचे प्रमाण अधिक नसल्याची खात्री करावी.
यानंतरच असे सोयाबीन विक्रीकरिता आणण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे. यानंतर शेतमाल विक्रीसाठी आणावा, यामुळे नागरिकांना होणारा त्रास वाचणार आहे.
...तर वाहतुकीचा भुर्दंड टळेल
ज्या शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणाबाबत खात्री करावयाची असेल, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या सोयाबीनचा नमुना त्यांच्या तालुक्याच्या शासकीय खरेदी केंद्रांवर आणून सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण तपासून घ्यावे, यामुळे ओलावा जास्त असल्याच्या कारणास्तव त्यांनी विक्रीस आणलेला शेतमाल नाकारण्यात आल्यास परत वाहतूक करण्याचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही.
सीसीआय १४ केंद्रात करणार कापूस खरेदी
सीसीआय या यंत्रणेमार्फत शासकीय हमी दराने कापूस खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात १४ कापूस खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीस आणताना शेतकऱ्यांनी कापसामध्ये ओलाव्याचे प्रमाण हे ८.५ टक्क्यांपेक्षा जास्त नसल्याची आणि काडीकचऱ्याचे प्रमाण अधिक नसल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.