Join us

Agriculture News : सोयाबीन, कापूस आंतरपिकाचा प्रयोग, चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्याची प्रयोगशील शेती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 2:35 PM

Agriculture News : शेतकरी प्रतीक मारोती काकडे यांनी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरपीक घेत भरघोस उत्पादन घेण्याची आशा व्यक्त केली आहे. 

- प्रकाश काळे 

चंद्रपूर : शेतीला दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे. निसर्ग शेतीला साथ देत नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी (Farmers) हतबल झाले आहे. त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत असतांनाच राजुरा तालुक्यातील वरोडा येथील युवा प्रगतिशील शेतकरी प्रतीक मारोती काकडे यांनी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरपीक घेत भरघोस उत्पादन घेण्याची आशा व्यक्त केली आहे. 

कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची आज बिकट अवस्था झाली आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हतबल झाले आहे. मात्र राजुरा तालुक्यातील वरोडा येथील युवा प्रगतिशील शेतकरी प्रतीक मारोती काकडे (Pratik Maroti Kakade) यांनी आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी धडपड चालविली आहे. प्रतीक हा कृषी महाविद्यालय मूल येथे शिक्षण घेत असून, आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केल्यास उत्पादनात वाढ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

आधुनिक तंत्रज्ञानाची शेती फायद्याचीच 

एक किलो सोयाबीन टोकन पद्धतीने लावले. शेतीत त्याने सोयाबीन आणि कापसाचे चांगले व्यवस्थापन केल्याने कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी हा आंतरपिकाचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी यशस्वी ठरणार आहे. सोयाबीन पिकाच्या लागवडीला ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून, झाडाला चांगल्या शेंगा लागल्या आहेत. त्यामुळे एक किलो सोयाबीन लागवडीनंतर कमीत कमी एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होईल अशी आशा शेतकऱ्याला आहे. 

शेतीत बदल करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन होऊन शेती फायद्याची ठरेल. दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीचे दिवस संपत चालले आहे. दिवसेंदिवस शेती कशी पुढे जाईल व ती कमी खर्चात कशी फायद्याची ठरेल यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत आहे.

शेतीला मोठ्या प्रमाणात अवकळा आल्याने शेतकरी हतबल झाले आहे. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी त्रस्त आहे. मात्र शेतकऱ्यांनी हार न मानता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीत नवनवीन प्रयोग करून शेती केल्यास उत्पादन वाढून शेतीची भरभराट होईल. - प्रतीक मारोती काकडे, युवा शेतकरी, वरोडा 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीसोयाबीनकापूस