Join us

सोयाबीन शेतकऱ्यांची परवड खर्च २० हजार अन् पदरात पडतायत २५ हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 10:08 AM

जमाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. मात्र, यावर्षी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला यंदा सरकारने चार हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे.

जमाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. मात्र, यावर्षी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला यंदा सरकारने चार हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे.

मात्र, यंदा सोयाबीनचे भाव चार हजारांवर पडल्याने लागवडीसाठी खर्च २० हजार उत्पन्न २५ हजार निघाल्याने पाच हजारांत जगायचे कसे?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जामखेड तालुक्यात यंदा सोयाबीनची २२ हजार हेक्टर क्षेत्रांवर पेरणी करण्यात आली होती. नव्याने काढलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात नेले. परंतु, व्यापारी सोयाबीनला वाढीव भाव देत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी एकूण एकरी २० हजार रुपये खर्च आहे, तसेच मळणी यंत्रातून काढण्यासाठी प्रतिक्विंटल दोनशे ते तीनशे रुपये द्यावे लागतात. एकरी चार ते सहा क्विंटल उत्पन्न मिळत आहे. हा भाव पाहता सोयाबीन पिकासाठी करण्यात आलेला खर्चही निघत नाही.

एकरी २० हजार रुपये खर्चसोयाबीन पेरणीपासून काढणीपश्चात शेतकऱ्यांना प्रति एकर आलेला अंदाजित स्वर्च असा नांगरणी दोन हजार रुपये, मोगडा पाळी दोन हजार, पेरणी दीड हजार, कोळपणी-खुरपणी दीड हजार, रासायनिक खत दीड हजार, बियाणे तीन हजार, किटकनाशक फवारणी दोन हजार पाचशे, काढणी-कापणी चार हजार, मशीनमधून काढण्यासाठी दोनशे पन्नास रुपये क्विंटल, वाहतूक खर्च २० ते २५ रुपये क्चिटल याप्रमाणे, अंदाजित २० हजार रुपयांचा खर्च लागतो.

प्रतिक्विंटलला ४२५० रुपयांचा भावकेंद्र सरकारने शेतीमालाला हमीभाव (किमान आधारभूत किंमत) निश्चित केला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात त्यापेक्षा कमी भाव पडतो. सोयाबीनचा प्रतिक्चिटल ४८९२ रुपये हमीभाव असला, तरी सरासरी ४२५० रुपयांनी विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाचा नुसताच हमीभाव, दरासाठी मात्र शेतकऱ्यांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

एकीकडे भाव कमी असताना ते खरेदी केंद्रावर नेण्यासाठी वाहतूक खर्च एक हजार रुपये, दहा रुपये प्रत्येक पोत्याला हमाली घेतली जात आहे. त्यामुळे हातात काहीच पडत नाही. याउलट अडत दुकानदारांनी बाजारभाव आणखी कमी केला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे. - दिलीप मुरूमकर, शेतकरी, साकत, ता. जामखेड

अनेक शेतकऱ्यांनी दर वाढतील, या आशेने मागील वर्षी सोयाबीन साठवून ठेवला. मात्र, उत्पादकांचीही निराशाच झाली. नव्या व जुन्या सोयाबीनला सध्या दर हे चार ते साडेचार हजार दरम्यान खाली घसरले. विकावे तर भाव नाही, घरात ठेवावे तर हाती पैसा नाही, अशी अवस्था सर्वत्र झाली आहे. - संदीप वराट, शेतकरी, साकत

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीपीकजामखेडसरकारराज्य सरकार