Join us

सोयाबीन पिकाला तातडीने पावसाची गरज, मराठवाड्यातील उत्पादन घटण्याची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 31, 2023 3:50 PM

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील उभ्या सोयाबीन पिकाला तातडीने पावसाची गरज असून पावसाला उशीर झाल्यास पीक धोक्यात येईल ...

महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील उभ्या सोयाबीन पिकाला तातडीने पावसाची गरज असून पावसाला उशीर झाल्यास पीक धोक्यात येईल असा इशारा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने (सोपा) दिला आहे.

ऑगस्टमध्ये पावसाची तूट कायम असताना आत्तापर्यंत पीक टिकून राहिले असले तरी तातडीने पावसाची गरज आहे. पुढील 45 दिवसात मान्सूनच्या अवस्थेवर सर्व काही अवलंबून असेल. पावसाला उशीर झाल्यास संपूर्ण देशातील सोयाबीन पिकाला फटका बसण्याची चिन्ह आहेत. असे या संस्थेच्या संचालकांनी 'द हिंदू' वृत्तपत्रास सांगितले.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदा देशात 124.71 लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. तर गेल्या वर्षी 120.82 लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली होती. महाराष्ट्रात 53.35 लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची वाढ झाली आहे. 

मागील आठवड्यात झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाला दिलासा दिला असला तरी पावसाने ओढ दिली तर पिकांवर ताण पडेल आणि त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे व्यापारी संघांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात 45 ते 60 दिवसांचे असणारे सोयाबीन पीक आता शेंगा येण्याच्या व भरण्याच्या अवस्थेत आहे. आतापर्यंत पिकांची एकंदर स्थिती सामान्य असली तरी तातडीने पावसाची गरज असून पावसाने ओढ दिल्यास पिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आणि विशेषतः सोयाबीनचे मोठे क्षेत्र असलेल्या मराठवाड्यात सोयाबीन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असेही 'सोपा'ने म्हटले आहे.

टॅग्स :शेतकरीलागवड, मशागतशेतीपाऊसमोसमी पाऊस