Join us

Soybean Hamibhav : सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव इतक्या रुपयांनी अधिक; शासनाने काय दिला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 7:56 PM

सोयाबीनचा हमीभाव हा मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढीव दर शेतकऱ्यांना मिळणार आहे. (Soybean Hamibhav)

Soybean Hamibhav :

मुंबई : आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा हमीभाव हा ४ हजार ८९२ रुपये इतका असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत २९२ रुपयांनी अधिक आहे.सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन २०२४-२५ साठी सोयाबीन करिता ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर मागील २०२३-२४ या वर्षाच्या हमीभावापेक्षा २९२ रुपये प्रति क्विंटल इतका जास्त आहे.

महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी  केंद्र शासनातील नाफेड व एन.सी.सी.एफ. तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली.सदर बैठकीमधील चर्चेनुसार  यंदाच्या हंगामामध्ये २०२४-२०२५ मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत प्रथमतः महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपुर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक १ ऑक्टोबरपासुन सुरु करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही नोडल एजन्सी सोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदीकरीता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करुन नाफेड व एन.सी.सी.एफ. कार्यालयाने २६ जिल्ह्यांतील एकुण २५६ खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली असुन त्यापैकी २४२ खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहेत.कार्यन्वित झालेल्या खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदरील योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, याकरीता राबविण्यात येत आहे.त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीकरीता आपल्या नाफेड / NCCF च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जाऊन ७/१२ उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवुन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी व विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा, असे सुचित करण्यात आले आहे.तसेच आजपर्यंत सुमारे ५ हजार शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून याबाबत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारशेतीशेतकरी