खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीनला चांगला भाव मिळेल, या आशेने तीन महिन्यांपूर्वी घरात ठेवलेले सोयाबीन काही शेतकऱ्यांनी आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात विक्रीस आणले होते. बाजारात सोयाबीनला ४४०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीन चांगले असतानाही मनाजोगा भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर आठवडी बाजार चांगला भरेल असे वाटले होते; परंतु वाढते ऊन लक्षात घेता बाजार साधारण बाजार भरला होता. काही शेतकऱ्यांनी भाव मिळेल या आशेने तीन महिन्यांपूर्वी घरात ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी आणले होते.
सोयाबीन विक्रीतून आलेले पैसे बियाणे, खते व इतर शेतीविषयक साहित्य घेण्यासाठी कामी येतील, असा शेतकऱ्यांचा मानस होता; परंतु बाजारात सोयाबीनला म्हणावा तसा भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आलेले तसे निघून जाताना दिसून आले.
सोयाबीन बरोबर भुईमूग व हरभरा ही पिके शेतकऱ्यांनी विक्रीस आणली होती. जवळाबाजार औंढा तालुक्यातील उपबाजारपेठ असून, या ठिकाणी कोंडशी, आडगाव (रंजे), बोरी (सावंत) कळंबा, असोला, पुरजळ, नहाद, अजरसोंडा, नालेगाव, तपोवन, करंजाळा आदी गावांतील शेतकरी नेहमीच बाजारासाठी येतात.
उन्हाच्या तीव्रतेमुळे २ जूनच्या आठवडी बाजारासाठी दहा ते बारा गावांतीलच शेतकरी आल्याचे पाहायला रविवारी पहावयास मिळाले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणीही राहीना
शेतीमालाला भाव मिळावा, यासाठी शेतकरी शासनाकडे मागणी करीत आहेत; परंतु शेतकऱ्यांची मागणी कोणीही लक्षात घेत नाही. काबाडकष्ट करणाऱ्यांच्या मागे कोणीच नसते, अशी परिस्थिती आहे. - माणिकराव दशरथे, शेतकरी, परळी
शेतकरी सद्यःस्थितीत भुईमूग काढणी करीत असून शेंगांना भाव मिळेल असे वाटले होते; परंतु रविवारच्या बाजारपेठेत भुईमूग शेंगांना ५३०० रुपये भाव मिळाला आहे. -आत्माराम चव्हाण, आडगाव (रंजे), शेतकरी