पुणे : राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत असून, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा ६ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
आतापर्यंत सुमारे ३ लाख ३४ हजार टन खरेदी झाली आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ २४ टक्केच खरेदी होऊ शकली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत ७७५ कोटी रुपये थेट खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये, यासाठी सरकारने राज्यभर हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला होता.
त्यासाठी ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटलने सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि नॅशनल को. ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांना देण्यात आले.
त्यासाठी राज्य सरकारने १५ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले. नाफेडने १ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली. ही मुदत रविवार, १५ डिसेंबरला संपली.
या मुदतीत १४ लाख टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट असताना केवळ १० टक्केच खरेदी झाली. शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने नाव नोंदणीसाठी ही मुदत ३१ डिसेंबर करण्यात आली होती.
तीन लाख ३४ हजार टन सोयाबीन घेतले विकतराज्यात यासाठी ५८१ केंद्रांना खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील ५५१ केंद्र सुरू असल्याची माहिती सहकार व पणन विभागाकडून देण्यात आली. या केंद्रांवर आतापर्यंत ३ लाख ३४ हजार टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. त्यात नाफेडने २ लाख ५० हजार टन सोयाबीन विकत घेण्यात आले. तर एनसीसीएफ कडून ८४ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली.
दीड लाख टन सोयाबीनचे पैसे केले अदानाफेडने खरेदी केलेल्या सोयाबीन पोटी शेतकऱ्यांना सुमारे ६२१ कोटी रुपयांचे थेट खात्यावर हस्तांतरण करण्यात आले आहे. तर एनसीसीएफ कडून १५४ कोटी रुपये दिले आहेत. nafed नाफेडकडून आजवर दीड लाख टन सोयाबीनचे पैसे दिले आहेत. दररोज ३० कोटी रुपये देण्यात येतात. वखार पावत्या पोर्टलवर अपलोड केल्यावर एका दिवसात पैसे दिले जातात, असे 'नाफेड'ने सांगितले.
अधिक वाचा: Sathekhat : साठेखत म्हणजे नक्की आहे तरी काय; का केले जाते साठेखत? पाहूया सविस्तर