अक्कलकोट : 'कमी खर्च, नो रिक्स' म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाकडे अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत तिप्पटीने पेरणी झाली असून सध्या काढणीला जोर आला आहे.
पेरणीपासून ते काढणीपर्यंत इतर पिकाच्या तुलनेत कमी खर्चिक पीक म्हणून शेतकऱ्यांकडून सोयाबीनकडे पाहिले जात आहे. अक्कलकोट तालुक्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३,५७८ हेक्टर इतके आहे. त्यात दरवर्षी झपाट्याने वाढ होत यंदा तब्बल १३,६१७ हेक्टरवर गेली आहे.
पूर्वी ठराविक दोनच मंडळ मध्ये पीक घेतले जात होते. आता चारही मंडळामध्ये सोयाबीन पीक घेतले जात आहे. उत्पादन दुप्पटीने निघत आहे. त्याला चांगला दरही मिळत आहे. एकंदरीत यंदा शेतकऱ्यांचे बंपर पीक म्हणून शेतकरी वर्गातून चर्चा आहे.
तडवळ, मैंदर्गीत वाढली पेरणी सोयाबीन चार महिन्याचे पीक आहे. ३० किलोच्या एका बॅगची किंमत ३ हजार रुपये आहे. प्रति एकर तीस किलो बियाणे पेरणीसाठी लागत असते. यंदा एकरी १५ ते १७ पाकीट उत्पादन निघत आहे. सध्या दर ४००० ते ४५०० रुपये इतका आहे. पूर्वी केवळ वागदरी, अक्कलकोट महसूल मंडळात हे पीक सर्रास घेतले जात होते. यंदा तडवळ मैंदर्गी मंडळात मोठ्या प्रमाणात पेरणी वाढली आहे.
सोयाबीन पेरणी वाढीसाठी प्रचार व प्रसिद्धी देण्यात येते. अनुदानावर बियाणे देण्यात आले आहे. कमी खर्चाचे पीक आहे. यंदा उतारा चांगला निघत आहे. याला स्थानिक बाजारपेठ कमी प्रमाणात असून सोलापूर, लातूर, मराठवाड्यात मुबलक बाजारपेठ उपलब्ध आहे. यावर्षी पिकाला लागेल तसा पाऊस झाला आहे. याचाच फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. - हर्षद निगडे, तालुका कृषी अधिकारी
आम्ही यंदा दोन एकरमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. नुकतीच रास करण्यात आली. तब्बल ३० पाकीट उत्पादन निघाले आहे. कमी खर्चिक पीक असून यंदा सर्वाधिक उत्पन्न निघाले आहे. - चंद्रकांत गुरव शेतकरी, कडबगाव