सिन्नर तालुका खरेदी-विक्री केंद्रात सोमवारपासून (दि. ४) सोयाबीनची आधारभूत किमतीत खरेदी सुरू झाली असून ४८९२ रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. मागील वर्षी शासनाकडून क्विंटलला ४६०० रुपयांचा भाव मिळाला होता. यंदा यात २९२ रुपयांनी वाढ झाली आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे चेअरमन नितीन आव्हाड, व्यवस्थापक दत्तात्रय राजेभोसले यांनी केले आहे.
तालुक्यात सोयाबीनची लागवड जास्त प्रमाणात झाली आहे. चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, बाजारपेठेत ४१०० ते ४३०० रुपये दराने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे सोयाबीनची खरेदी केली जात आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या सोयाबीनच्या आधारभूत किमतीत खरेदी होण्यासाठी राज्य पणन मंडळाच्यावतीने सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाला अधिकृत खरेदी अभिकर्ता म्हणून मान्यता मिळाली आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, मोबाइल नंबर, सोयाबीन पिकाचा पीक पेरा नोंद उतारा, सोयाबीनची नोंद असलेल्या जमिनीचा सातबारा खाते उतारे, ४ पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयात ११ ते सायंकाळी ५ या वेळेत घेऊन येत ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खरेदी-विक्री संघाकडेच विक्री करण्याचे आवाहन
• शासनाने सोयाबीनसाठी ४८९२ रुपये क्चिटल इतकी किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे.
• मात्र, व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत असून शेतकऱ्यांकडून ४२०० रुपयांनी सोयाबीन खरेदी करत आहेत.
• शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यासाठी खरेदी-विक्री संघाकडेच सोयाबीन विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : Honey Health Benefits : मधाळ मधाचे आरोग्यदायी फायदे