सरकारने राज्यात एकूण २१० साेयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची घाेषणा सप्टेंबरमध्ये केली हाेती. ही केंद्र १५ ऑक्टाेबरपासून सुरू केली जाणार हाेती. ती अद्यापही सुरू करण्यात आलेली नाहीत. याबाबत नाफेड व एनसीसीएफचे अधिकारी बाेलायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने साेयाबीन विकावे लागत असल्याने प्रतिक्विंटल ७०० ते १,३०० रुपये म्हणजेच सरासरी एक हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
यावर्षी साेयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आधीच मावळली असल्याने तसेच निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक हाेऊ नये, यासाठी राज्य सरकारने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील २६ जिल्ह्यांत एकूण २१० साेयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला व ही खरेदी १५ ऑक्टाेबरपासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले. महिनाभरात नाफेड व एनसीसीएफने काेणत्याही जिल्ह्यात साेयाबीन खरेदी केंद्र सुरू केले नाही.
केंद्र सरकारने साेयाबीनची एमएसपी प्रतिक्विंटल ४,८९२ रुपये जाहीर केली असताना राज्य सरकारने खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी ३,५०० ते ४,१०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापाऱ्यांना साेयाबीन विकावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना २,२०० ते ३,२०० रुपये दराने साेयाबीन विकावे लागले आहे.
१३ लाख टनाचे उद्दिष्ट्य
यावर्षी राज्य सरकारने एमएसपी दराने ९० दिवसांत १३ लाख टन साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. त्यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांत नाफेडची १४७ आणि सात जिल्ह्यांत एनसीसीएफची ६३ साेयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला हाेता. या दाेन्ही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून, त्यांची कार्यप्रणाली विचारात घेता त्या राज्यात शेतकऱ्यांकडून १३ लाख टन साेयाबीन खरेदी करतील, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
अशी आहेत खरेदी केंद्रे
नाफेडच्या १४७ केंद्रांमध्ये अकाेला जिल्ह्यातील ५, अमरावती - ८, बीड - १६, बुलढाणा - १२, धाराशिव - १५, धुळे - ५, जळगाव - १४, जालना - ११, काेल्हापूर - १, लातूर - १४, नागपूर - ८, नंदुरबार - २, परभणी - ८, पुणे - १, सांगली - २, सातारा - १, वर्धा - ८, वाशिम - ५ व यवतमाळ - ७ तसेच एनसीसीएफच्या ६३ केंद्रांमध्ये नाशिक - ६, अहमदनगर - ७, साेलापूर - ११, छत्रपती संभाजीनगर - ११, हिंगाेली - ९, चंद्रपूर - ५ आणि नांदेड जिल्ह्यातील १४ केंद्रांचा समावेश आहे.