शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी लातूर जिल्ह्यात १५ हमीभाव केंद्रांचे दरवाजे उघण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी ऑनलाइन नोंदणी करीत असून आतापर्यंत १३ हजार ३२४ शेतकयांनी नोंदणी केलीया आहे. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्राचा आधार घेणे गरजेचे ठरत आहे.
लातूर जिल्ह्यात यंदा खरिपाचा ५ लाख ९८ हजार ८३२ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा ४ लाख ९० हजार ९०६ हेक्टरवर झाला होता. मध्यंतरी जेमतेम पाऊस झाल्याने सोयाबीन पीक चांगले बहरले होते. मात्र, काढणीच्या कालावधीत मुसळधार पाऊस झाला. परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
राशीनंतर शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणू लागल्यानंतर बाजारपेठेत ४ हजार ३७० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळू लागला. हमीभावाच्या तुलनेत अत्यंत कमी दर असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले. त्यामुळे शासनाने महिनाभरापासून हमीभाव केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणीचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १३ हजार ३२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.आर्द्रता अधिक असल्याने शेतमाल खरेदी करणे केंद्रांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल वाळवून आणावा.
शेतमाल वाळवून आणावा...
सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव आहे. खरेदीसाठी जिल्ह्यात १५ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत १३ हजार ३२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून दिवसेंदिवस नोंदणी वाढत आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणताना तो व्यवस्थितरीत्या वाळवून आणावा. त्याची आर्द्रता १२ टक्क्यांपेक्षा कमी असावी. - विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.
९ लाख रुपयांची खरेदी...
हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात १५ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत १३ शेतकऱ्यांनी १८० क्विंटल सोयाबीन विक्री केली आहे. ती ८ लाख ७८ हजार ११४ रुपयांची आहे. १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असलेल्या सोयाबीनची विनाविलंब स्वरेदी करण्यात येत आहे.
नोंदणीसाठी १५ दिवस शिल्लक...
सोयाबीन विक्रीच्या नोंदणीस १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांनी नजिकच्या केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. त्यासाठी आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, ऑनलाइन पीकपेरा असलेला ७/१२ उतारा आवश्यक असल्याचे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात साडेतेरा हजार शेतकऱ्यांची नोंदणी...
तालुका | नोंदणी |
लातूर | २५४१ |
चाकूर | १३५२ |
औसा | ८४३ |
रेणापूर | १६६६ |
उदगीर | ३६०६ |
देवणी | ४६५ |
अहमदपूर | ९७१ |
निलंगा | ८४४ |
शिरुर अ. | ४५६ |
जळकोट | ५८० |