Join us

soybean moisture : जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाचा निर्णय; शेतकऱ्यांचा होणार फायदा वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 3:40 PM

परभणी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाचा शेतकरी हितकारक निर्णय वाचा सविस्तर (soybean moisture)

soybean moisture : 

परभणी :  हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतमालातील आर्द्रता तपासणीचे यंत्र ठेवण्यात आले आहे. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आता केंद्रावरील कर्मचारीच नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण तपासणार आहेत.

परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीनची हमीभाव दराने खरेदी करण्यासाठी ९ केंद्र उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत दोन केंद्रांच्या माध्यमातून ७५४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. 

ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी केंद्राच्या माध्यमातून संदेश पाठवण्यात येत आहेत. ते शेतकरी सोयाबीन घेऊन केंद्रावर विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क्यांहून अधिक राहात असल्याने हे सोयाबीन केंद्र चालकांना खरेदी करता येत नाही. 

परिणामी शेतकऱ्यांना आल्या पावली घरी परतावे लागत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिकदृष्ट्या फटका बसत आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या वतीने यात बदल करण्यात आला आहे. 

आता नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी केंद्रावरील कर्मचारी जाणार आहेत. त्या ठिकाणी सोयाबीनमधील आर्द्रता तपासून पुढील सूचना त्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च या निर्णयामुळे वाचणार आहे. 

५,९३४ शेतकऱ्यांनी केली नोंदणी

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, बोरी, पेडगाव व परभणी येथे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांवर २८ ऑक्टोबरपर्यंत ५ हजार ९३४ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यातील ४८ शेतकऱ्यांचे ७५४ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.

पावणे चार कोटींची देयके बाकी

• हमीभाव खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी केल्यानंतर आठ दिवसात त्याच्या खात्यावर मोबदला पडणे आवश्यक आहे.

• मात्र, परभणी आणि पूर्णा केंद्रावर आतापर्यंत ४८ शेतकऱ्यांचे ७५४ क्विंटल ४८ किलो सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.

७ केंद्र कधी सुरु होणार

• नाफेडच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर साडेपाच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु, नऊ पैकी सात हमीभाव केंद्र अद्यापही सुरु झालेले नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकृषी योजनाशेती