सातारा : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणीकरिता मुदवाढ देण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर वाई येथेही खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरेदी केंद्रांची संख्या ६ झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली आहे.
शासनाने २०२४-२५ वर्षासाठी निश्चित केलेल्या आधारभूत किंमत म्हणजे ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघामार्फत केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
यात जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, फलटण आणि कऱ्हाड येथील तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाना तसेच मसूरला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेस केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.
आता नव्याने वाई येथे केंद्र सुरू करण्यासाठी खरेदी-विक्री संघास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या ६ झाली आहे. कोरेगाव व मसूर येथील केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरूआहे.
आतापर्यंत कोरेगाव केंद्रावर १११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून १२८ क्विंटलची खरेदी झाली आहे. तर मसूर केंद्रावर २९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ६ शेतकऱ्यांच्या ६४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.
सातारा येथेही ४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून खरेदी-विक्री संघाकडून वडूथ येथे लवकरच प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहे. फलटण येथे ७८ आणि कहऱ्हाडला ५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
वाई येथील नवीन केंद्रावर शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी होताच प्रत्यक्ष खरेदीस सुरुवात होणार आहे, अशी माहितीही जिल्हा पणन अधिकारी हनुमंत पवार यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य
जिल्ह्यातील सहाही खरेदी केंद्रांवर सोयाबीन आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन नोंदणीची वाढीव मुदत १५ नोव्हेंबरला संपणार होती. परंतु अद्यापही इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी झाली नसल्याने नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.