लातूर / औंढा नागनाथ : हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी (Soybean sale) शेतकरी वाहनांच्या रांगा अद्याप कायम आहेत. आणखीन पन्नास हजारांच्या आसपास शेतकरी (Farmer) सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
तर दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांना नोंदणीचा मेसेज नाही, त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी (Soybean kharedi) मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, गुरुवारी (६ फेब्रुवारी) रोजी खरेदी केंद्र बंद होणार असल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत होते.
लातूर जिल्ह्यात एकूण ५२ हमीभाव खरेदी केंद्रे आहेत. या केंद्रांवर सोयाबीन खरेदीच्या प्रारंभापासून या ना त्या कारणाने अडचणी आहेत. कधी बारदाना नसल्यामुळे खरेदी केंद्रे बंद होती. तर कधी मुदत संपल्याने खरेदी केंद्रे बंद करण्यात आली.
शेतकऱ्यांमधून उठाव झाल्यानंतर ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनात पडून आहे. दररोज हजार-बाराशे रुपये वाहनांचा खर्च सहन करून शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे.
गुरुवारी खरेदी केंद्र बंद झाले तर पुन्हा काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. संदेश न आलेले सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
५० हजारांपर्यंत शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्याप विक्रीसाठी प्रतीक्षेत आहे. शिवाय, दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदी केंद्राकडून मेसेज आला नाही. त्यामुळे खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आहे.
बाजारात चार तर हमीभाव केंद्रावर ४,८९२ रुपये दर
* बाजारामध्ये सोयाबीनला जवळपास चार हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे. हमीभाव केंद्रावर मात्र ४ हजार ८९२ दर जाहीर आहे.
* क्विंटल मागे ८०० ते ९०० रुपये जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची तळमळ आहे. त्यामुळेच नोंदणीसाठी खरेदी केंद्रांवर वाहने घेऊन त्यांनी रांगा लावलेल्या आहेत.
आता मुदतवाढीची धाकधूक कायम
'एनसीसीएफ' अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतीचा शेवटचा दिवस ६ फेब्रुवारी होता. या दिवशी जिल्ह्यातील १५ पैकी बहुतांश खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, नोंदणी केलेल्या शेवटच्या शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करा, अशी मागणी औंढा नागनाथ येथील राष्ट्रवादी काँगेसने जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय दराडे, उपसभापती बाबाराव राखुंडे, आदित्य आहेर, गोपाल मगर, माऊली ढोबळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
पोर्टल सुरू तोपर्यंत खरेदी
सध्या पोर्टल चालू आहे. रात्री १२ नंतर बंद होण्याची शक्यता आहे. पाच-सहा वजन काटे लावून खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. पोर्टल बंद झाल्यानंतर आम्हाला काही करता येणार नाही. -विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग आधिकारी, लातूर