Join us

सोयाबीन उत्पादक एकरी ११०० रुपयांनी तोट्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 4:30 PM

खर्च १८,७०० अन् उत्पन्न मिळाले १७,६०० रुपये

नगदी पीक म्हणून कापसासह सोयाबीनलाशेतकरी पसंती देतात. यंदा ३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती; मात्र, सुरुवातीला उघडीप व नंतर अतिवृष्टीचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला. सोयाबीनसाठी एकरी १८,७०० रुपयांचा लावगड खर्च केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न १७,६०० रुपयेच मिळाले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना एकरी ११०० रुपयांचा घाटा झाला आहे.

एककीडे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचा परिणाम उत्पादन व खर्चाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. यासाठी शासनस्तरावरून शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत शाश्वत भाव द्यावा, अशी मागणी शेती तज्ज्ञांतून होत आहे.

सोयाबीनची आवक ८२ हजार क्विंटल

यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने १ एप्रिल २०२३ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या याति केवळ ८२ हजार ७२९ क्चिटल सोयाबीनची आवक झालेली आहे. यासाठी कमाल ५२०० ते किमान ४५०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. सध्या केवळ दररोज ५०० ते ६०० पोत्यांचीच आवक होत आहे.

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

एका एकरात सरासरी ३ ते ४ क्विंटल उत्पन्न

नांगरणी ७०० रुपये, वखरणी ७०० रुपये, पेरणीपूर्व मशागत ७०० रुपये, सोयाबीन बॅग ३ हजार, खत १५०० रुपये, पेरणी ७०० रुपये, तणनाशक ५०० रुपये, डवरणी दोन वेळेसची २ हजार, कीटकनाशके किमान तीन वेळेस २ हजार, सोयाबीन कापणी ३ हजार रुपये, ताडपत्रीसाठी १२०० रुपये, बारदाना ३०० रुपये, सोयाबीन मळणीसाठी एक हजार रुपये, वाहतूक खर्च १२०० रुपये, अडत खर्च २०० रुपये याप्रमाणे १८ हजार ७०० रुपयांचा खर्च आला आहे. तर, एका एकरात सरासरी तीन ते चार क्चिटल सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. त्यासाठी सरासरी प्रतिक्चिटल ४४०० रुपयांचा भाव गृहीत धरल्यास १७ हजार ६०० रुपयांचे उत्पन्न हाती पडेल.

यंदा सोयाबीनमध्ये शेतकऱ्याला एकरी ११०० रुपयांचा तोटा झाला आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीनला मोठा फटका बसल्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी सर्व ९३ महसूल मंडळांमध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अॅडव्हान्स) मंजूर करण्यात आलेला आहे. त्यासाठी ३११ कोटी रुपये तालुक्याला वितरित करूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिमची रक्कम जमा झाली नाही.

टॅग्स :सोयाबीनबाजारशेतकरी