पुणे : जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल अडीचपटींनी वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी सुमारे २१ हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात लागवड सुमारे ५१ हजार हेक्टर झाली आहे.
तसेच यंदा मॉन्सूनने चांगली साथ दिल्याने जिल्ह्यात खरीप पिकांखालील लागवड जवळपास दुप्पट झाली आहे. सोयाबीनला मिळणारा बाजारभाव लक्षात घेता, भविष्यात या पिकाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी व्यक्त केला.
विदर्भ मराठवाडा व खानदेशात कापूस पिकाखालील क्षेत्रात घट होऊन आता सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. हाच पॅटर्न आता पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी लागू करत आहेत. जिल्ह्यात यंदा सोयाबीनची लागवड विक्रमी क्षेत्रावर झाली आहे.
जिल्ह्याची सरासरी लागवड २० हजार ९८२ हेक्टर इतके असून, सोयाबीनची प्रत्यक्ष लागवड ५० हजार ८०६ हेक्टर इतकी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ही वाढ तब्बल अडीचपट आहे.
हे पीक तीन महिन्यांत येणारे असून, त्याला मिळणारा बाजारभावही चांगला असल्याने अनेक शेतकरी या पिकाकडे वळत असल्याचे काचोळे यांनी स्पष्ट केले. भविष्यातही जिल्ह्यात सोयाबीनची लागवड आणखी वाढेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
१३, ७४७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सोयाबीनची लागवड वाढत असून, यंदा सर्वाधिक १८ हजार ९६० हेक्टर लागवड आंबेगाव तालुक्यात झाली असून, त्याखालोखाल खेड तालुक्यात १३ हजार ७४७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
सरासरीच्या दुप्पट पेरणी
● कृषी विभागाने जिल्ह्यातील अंतिम पीकपेरणीचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे सादर केला असून, त्यानुसार जिल्ह्यात यंदा खरीप पिकांखालील क्षेत्राच्या सरासरीच्या तुलनेत दुप्पट पेरणी झाली आहे.
● जिल्ह्यात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र १ लाख ९५ हजार ७१० हेक्टर इतके आहे. मात्र, यंदा ही पेरणी ३ लाख ९० हजार २२७ हेक्टर अर्थात दुप्पट (१९९ टक्के) इतकी झाली आहे.
● त्यात प्रामुख्याने मका, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस या पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे.
तालुकानिहाय सोयाबीनची लागवड (हेक्टरमध्ये)
• हवेली ६६१
• मुळशी ३६६
• भोर ३,२५०
• मावळ ५१६
• वेल्हे ७४
• खेड १३,७४७
• आंबेगाव १८,९६०
• जुन्नर ४,९१७
• शिरूर ३,७९३
• बारामती १,७०३
• इंदापूर ३८९