Join us

सोयाबीनला दरवाढीची प्रतिक्षाच! बाजारसमित्यांमध्ये मिळतोय हमीभावाहून कमी दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 12:23 PM

हातावर मोजण्याएवढा बाजार समित्या सोडल्या तर कुठेच हमीभावाएवढा दर सोयाबीनला मिळत नसल्याचं चित्र आहे.

डोणगाव परिसरात शेतकऱ्यांनी सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेने लागवड केली होती. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. आता उत्पादन हाती लागले असताना भाव वाढत नसल्याने सोयाबीन घरात पडून आहे. सद्यस्थितीत सोयाबीनला ४,३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

खर्चही निघेल की नाही?

यावर्षी उत्पन्नात मोठी घट झाली आहे. तसेच दरातसुद्धा मोठी घसरण झाल्याने पिकावर झालेला खर्चही निघेल की नाही, या विवंचनेत शेतकरी आहे. बहुतांश शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करीत आहेत. सुरुवातीला कमी पाऊस, त्यानंतर पावसाचा खंड, येलो मोझेंक व विविध रोगराईच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यानंतर कसेबसे काही प्रमाणात सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात आले आहे. परंतु, यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने घरात पडून आहे.

काय म्हणतात शेतकरी?

सध्याच्या काळात शेती २००८ मध्ये सोयाबीनला करणे खूप कठीण झाले आहे. वातावरणही साथ देत नाही. शेतीसाठी खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. अशातच सोयाबीनला भाव कमी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.- विनायकराव टाले,शेतकरी, आरेगाव.

सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कमी पाऊस व विविध प्रकारच्या रोगराईमुळे उत्पन्न कमी झाले आहे. त्यातच भाव नसल्याने सोयाबीन घरात पडून आहे.- विजय खरात शेतकरी, डोणगाव

४,३०० रुपये भाव होता व २,०२४ मध्येही तोच भाव मिळतो. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन सोयाबीनला चांगला भाव मिळवून द्यावा.- सुभाष अढाव, शेतकरी

एक तर निसर्गाचा लहरीपणा व त्यातच उत्पादन कमी व आता सोयाबीन दर ही कमी शेतकरी अर्थिक संकटात आता शेतकऱ्यांनी जगायचे कसे?- गजानन संभाजी आखाडे,शेतकरी डोणगाव.

सोयाबीनचा भाव काय?

यंदा हंगामाच्या सुरूवातील सोयाबीनला चांगला दर मिळाला. मात्र, एक ते दीड महिन्यानंतर सोयाबीनचे दर खाली आले आणि सध्या हातावर मोजण्याएवढा बाजार समित्या सोडल्या तर कुठेच हमीभावाएवढा दर सोयाबीनला मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून काही शेतकऱ्यांना मातीमोल दरामध्ये सोयाबीनची विक्री केली आहे. 

सोयाबीनला कुठेच मिळेना हमीभावाएवढा दर

कालच्या (दि १ मार्च) दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा ४ हजार ६२० रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. हा दर उमरखेड बाजार समितीत मिळाला असून येथे केवळ २४० क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ३ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर हमीभावापेक्षा ९०० रूपये प्रतिक्विंटलने कमी आहे. 

टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्ड