Spray Pump Subsidy Scheme : एकात्मिक कापूस, सोयाबीन व उतर तेलबिया उत्पादनात वाढ व्हावी व मुल्यसाखळी विकासासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजनेची करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर म्हणजे मोफत फवारणी पंप मिळणार आहे. पण आत्तापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास २ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप राज्य सरकारकडून मिळणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून कापूस मुल्यसाखळीसाठी १ लाख ६ हजार ३८९ आणि सोयाबीन मुल्यसाखळीसाठी १ लाख ३० हजार ३८ असे मिळून एकूण २ लाख ३६ हजार ४२७ शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाच्या योजनेची घोषणा केली होती. तर यासाठी कापूस आणि सोयाबीन मुल्यसाखळीत एकूण ४ लाख ९४ हजार १०३ शेतकऱ्यांना अर्ज केले होते. तर यातून १ लाख ९१ हजार १६९ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड झाली आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा केला जाणार आहे. तर शासन या पंपाची ३ हजार ४२५ रूपये प्रमाणे खरेदी करणार आहे. तर महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाकडून क्षेत्रीय स्तरावर या पंपाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोडतीत नाव आले आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहाय्यकाला किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करायचे आहे.
क्षेत्रीय स्तरावर फवारणी पंप अजून पोहोचले नसून लवकरच शेतकऱ्यांना पंप मिळणार असल्याचं महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. तर फवारणी पंप योजनेच्या यादीमध्ये सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर मधील एकाही शेतकऱ्यांचे नाव नाहीत, केवळ विधानसभेच्या निवडणुकीपुरती योजना असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.