राजाराम लोंढे
कोल्हापूर : शेतमजुरांची वानवा असल्याने भांगलणीचे काम वेळेत होत नसल्याने शेतकरी तणनाशकांकडे मोठ्या प्रमाणात वळू लागला आहे. जिल्ह्यात एका एका तणनाशकांची वार्षिक विक्री १०० टनांपेक्षा अधिक आहे.
यावरून शेतकऱ्यांचा वापर किती वाढला ते लक्षात येते. कीटकनाशक, तणनाशकांचा अतिरेक जमिनीबरोबर माणसाला घातक ठरत असला तरी कमी वेळेत शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी सर्रास वापर होत आहे.
जिल्ह्यात एकूण पेर क्षेत्रापैकी सर्वाधिक ऊस आणि त्यानंतर भाताची लागवड केली जाते. या पिकांची भांगलण काढणीपर्यंत करावी लागते. सतत पाणी असल्याने तणाची उगवण वेगाने होते. त्यात खतांचा डोस मिळाल्यानंतर पिकांबरोबरच तणही जोमाने वाढते.
पण मजुरांची वानवा असल्याने भांगलण, खुरपणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकांचा वापर वाढवला आहे. पंप घेऊन बसण्यापेक्षा त्यातही स्वतः पाठीवर तणनाशक मारत मजुरांकडून त्याची फवारणी केली जात आहे. त्यासाठी पंपावर मजुरी आकारली जात असून, २० ते ५० रुपयांपर्यंत पंप फवारणीचा दर आहे.
अति तणनाशक वापराचा परिणाम
• जमीन कडक होते.
• जीवाणूंची संख्या कमी होते.
• सेंद्रिय कर्ब कमी होतो.
• जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते.
हे आहेत फायदे
• शेतमजूर शोधण्यापेक्षा तणनाशकाचा पर्याय सुलभ व सोपा आहे.
• तणनाशक फवारणीमुळे स्वस्तात व व कमी कालावधीत तणावर नियंत्रण करता येते.
• तणनाशकाच्या वापरामुळे मजुरांच्या तुलनेत ६६ टक्क्यांपर्यंत खर्च कमी होतो.
तणनाशक, कीटकनाशकांचे दर १० टक्क्यांनी कमी
कीटकनाशक व तणनाशकांसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून मोठ्या प्रमाणात येतो. कोरोना काळात आयात बंद झाल्याने त्यानंतरच्या दोन वर्षात सर्वच कीटकनाशक व तणनाशकांच्या कंपन्यांनी दरात मोठी वाढ केली होती. आता कच्च्या मालाची बाजारपेठ स्थिर असल्याने यावर्षी दर १० टक्क्यांनी कमी झाले आहेत.
मजूर मिळत नाहीत, मिळाले तर त्यांची मजुरी परवडत नाही, तसेच भांगलण परवडत नाही. यासाठी तणनाशक हाच पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. - बाबूराव खाडे, शेतकरी
अधिक वाचा: Shettale Yojana शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता दीड लाखाचे अनुदान