Join us

पीक उत्पादन वाढीसाठी पिकांवर अन्नद्रव्यांची फवारणी फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 9:15 PM

पिकांना फवारणी द्वारे दिलेली अन्नद्रव्ये ही पिकास जमिनीतून द्यावयाच्या शिफारस केलेल्या अन्नद्रव्यास कधीही पर्याय होऊ शकत नसली तरीही काही कारणांमुळे अचानक निर्माण झालेली पानातील पोषकद्रव्यांची कमतरता ही अन्नद्रव्ये भरून काढतात.

पिकांना फवारणी द्वारे दिलेली अन्नद्रव्ये ही पिकास जमिनीतून द्यावयाच्या शिफारस केलेल्या अन्नद्रव्यास कधीही पर्याय होऊ शकत नसली तरीही काही कारणांमुळे अचानक निर्माण झालेली पानातील पोषकद्रव्यांची कमतरता ही अन्नद्रव्ये भरून काढतात. जमिनीत जास्त कालावधीसाठी अति ओल किंवा अति शुष्कता या दोन्ही टोकाच्या परिस्थितीत पिकास जमिनीतून अन्नद्रव्ये शोषता येत नाहीत. अशावेळी विशेषतः नत्रासारख्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाची वाढ खुंटून पीक निस्तेज दिसू लागते किंवा पीक पुनरुत्पादन अवस्थेत असेल तर पालाशच्या कमतरतेमुळे दाण्याची वाढ, दाण्याचा आकार तसेच दाण्याचे वजन यावरही विपरित परिणाम होतो.

पिकात नवीन जोम येण्यासाठी तसेच त्याच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यासाठी पिकात पुरेशी ताकद येण्याकरिता विशिष्ट अन्नद्रव्याची पिकावर फवारणी करणे फायद्याचे ठरते. जमिनीत अति ओल किंवा अति शुष्कता ही परिस्थिती खरीप हंगामात आवर्जून आढळून येत असली तरी अलिकडे हवामान बदलामुळे पडणाऱ्या बिगर मोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या बाबतीतही अशी परिस्थिती अधूनमधून अनुभवयास मिळते. या व्यतिरिक्त पिकास जमिनीतून शिफारस केलेली खते शिफारशीत वेळेनुसार दिल्यानंतर पिकाच्या फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पुन्हा एकदा मुख्य अन्नद्रव्ये फवारणीच्या स्वरूपात दिल्याने पीक उत्पादनाची प्रत सुधारण्यास मदत होते तसेच उत्पादनाच्या वजनात सुमारे १० ते १५ टक्के वाढ होते.

रब्बी हंगामात घेतलेल्या गहू व हरभरा पिकास अन्नद्रव्यांची फवारणी केल्याने उत्पादन वाढीसाठी फायदा झालेला दिसून आला आहे. गहू पीक ५५ व ७० दिवसाचे असताना १९:१९:१९ या खताची २ टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) या प्रमाणात दोन वेळा गहू पिकावर फवारणी करावी. हरभरा पिकावरही याचप्रमाणे १९:१९:१९ या खताची फुले लागताना व घाटे भरताना अशा दोन वेळी २ टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम) ह्या प्रमाणात फवारणी करावी. ज्या शेतकरी बांधवांकडे १५ लिटर पाणी क्षमतेचा फवारणी पंप असेल त्यांनी १९:१९:१९ या खताचे प्रमाण दीडपट (१५ लिटर पाण्यात ३०० ग्रॅम) घ्यावे. अन्नद्रव्याची फवारणी करताना त्याबरोबर रासायनिक किटकनाशक किंवा रोगनाशक औषधी शिफारशीत मात्रेत एकत्रितपणे फवारता येतात.

डॉ. कल्याण देवळाणकर

टॅग्स :पीकरब्बीशेतकरीपाऊसगहूहरभरा