Join us

वसंत ऋतूची चाहूल! लातूरात बहरला पांगारा; या रानवृक्षात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 12:03 PM

वसंत ऋतूची चाहूल लागल्यानंतर पांगारा बहरतो...लालबुंद फुलांनी वेधले नागरिकांचे लक्ष..

लातूर जिल्ह्यातील जैवविविधता वाढविण्यासाठी विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचा उपक्रम पाच वर्षांपासून ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून सुरू आहे. दरम्यान, तीन वर्षांपासून शहरासह जिल्ह्यात पांगारा या प्रजातीची ७००-८०० झाडे ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. सध्या पांगारा या रानवृक्षांची फुले फुलत आहेत. शहरात पहिल्यांदाच पांगारा बहरत आहे; त्यामुळे वसंत ऋतूची चाहूलही लागत आहे.

शहरातील नांदेड रस्ता, जुनी रेल्वे लाइन रस्ता, ऑफिसर्स क्लबसमोरील रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी पांगारा या रानवृक्षाची लागवड करण्यात आली. त्याचबरोबर ती झाडे जगविण्यात आली. त्यामुळे त्यांची लालबुंद फुले बहरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

फेब्रुवारी ते एप्रिल येतो बहर..

लाल पांगाऱ्याचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू बनविण्यासाठी केला जातो. तसेच ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पांगाऱ्याची लाल फुले, फूलपाखरे, मधमाश्या, पक्ष्यांना आकर्षित करतात. पक्षी, भुंगे, मधमाश्या फुलांतील मध घेताना परागीकरण करतात. त्यातून धरलेल्या शेंगांमधील बी पडूनही रोपे होतात. पांगारा तसा फांद्या लावूनही जगतो. पांगारा वृक्षावर एकही पान नसताना लाल मनमोहक फुलांनी बहरतो. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगाऱ्यावर फुले येतात. या वृक्षाच्या फांद्यांवर काटे असतात. १५-२० फूट उंच हा वृक्ष वाढतो.

आयुर्वेदिक औषधी वनस्पती

• पांगारा ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून, त्याची फुलं फुलपाखरु, मधमाश्यांना आकर्षित करतात.

• वसंत ऋतूची चाहूल लागल्यानंतर पांगारा बहरतो. त्यानुसार सध्या पांगारा बहरत आहे.

पक्षी, फुलपाखरे, मधमाश्यांच्या संवर्धनातील महत्त्वाचा घटक

आयुर्वेदिकमध्ये पांगाऱ्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. साल, पानांत औषधी गुणधर्म आहेत. वृक्षाच्या सालीतील धाग्यापासून दोर बनवितात. अशा पद्धतीने पांगारा हा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष असून पक्षी, फुलपाखरे, मधमाश्यांच्या संवर्धनातील महत्त्वाचा घटक आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीम ही जैववैविध्य साखळी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. -डॉ. पवन लड्डा, ग्रीन लातूर वृक्ष टीम

टॅग्स :लातूरहवामान