भारत कृषी हवामानशास्त्र पुणे द्वारे आयोजित केलेल्या शास्त्रज्ञांचा अभ्यास दौरा अंतर्गत आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी हवामान विभाग श्रीलंकेचा शास्त्रज्ञांनी पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्र (KVK) जिल्हा कृषि हवामान केंद्रास (DAMU) तसेच कृषी हवामान सल्ला अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेट दिली. यावेळी केव्हिकेतील शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सुविधा उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अभ्यास दौ-याअंतर्गत श्रीलंका येथील हवामानशास्त्र विभागाच्या संचालक श्रीमती अयुशा रशांथी पटाबडी वरनासुरीया, हवामानतज्ञ उत्तमा वाडू जगथ दमिथा दी सिल्वा, हवामानतज्ञ हिथीथामी मुदीयान्सेलगे नीमल बन्डारा एकनायका तसेच हवामानशास्त्र विभागाच्या अधीकारी श्रीमती सेथुंगा मुदीयान्सेलगे उदारी बंडारा इत्यादी अधिकारी व हवामानतज्ञ तसेच भारत हवामानशास्त्र विभागाचे अधिकारी डॉ. संजय सोनपारोटे व कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सर्वांचे कार्यालयाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
या भेटीअंतर्गत केव्हीकेचे वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा नोडल ऑफीसर डॉ. के.के. झाडे यांनी जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) अंतर्गत प्रसारीत करण्यात येणा-या कृषि हवामान सल्लापत्रीकेबाबत सविस्तर माहिती प्रझेन्टेशनव्दारे दिली. तसेच केव्हीकेच्या विस्तार कार्याचेही प्रेझेन्टेशनव्दारे श्रीलंका येथील हवामानशास्त्र विभागाच्या अधिका-यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्थित श्रीलंका येथील अधिका-यांना जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) अंतर्गत कार्यन्वित असलेले स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) बदल हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ प्रा. अशोक निर्वळ यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग, मुंबई व हवामानशास्त्र विभाग, पुणे यांच्याकडून प्राप्त होणा-या माहितीचा कृषिहवामान सल्लापत्रीकेमध्ये कशाप्रकारे उपयोग केला जातो याची माहिती दिली. त्यानंतर सर्व अधीकारी यांनी केव्हीकेच्या प्रक्षेत्रांवरील पीक संग्रहालय, नर्सरी, मोसंबी फळबाग, शेततळे, कुक्कुटपालन युनिट, बियाणे प्रक्रीया युनिट इत्यादींना भेट देत माहिती घेतली.
यावेळेस श्रीलंका येथील शास्त्रज्ञांनी जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत प्रसारित होत असलेल्या कृषी हवामान सल्ला पत्रिका व केव्हिकेतील शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सुविधा उल्लेखनीय असून हा उपक्रम त्यांच्या देशामध्ये राबविण्यासाठी ते प्रयत्नशील असतील असे या कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले.
तसेच या अधिका-यांनी केव्हीकेच्या शास्त्रज्ञांसोबत जिल्हयातील सावखेडा ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर येथील श्री अभंग शेवाळे यांच्या शेतावर जाऊन कृषिहवामान सल्लापत्रीकेचा अवलंब करत असलेल्या शेतकऱ्या सोबत चर्चा केली व प्रक्षेत्र भेट घेवून त्याबदल माहिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ डॉ.किशोर झाडे प्रा. गीता यादव, डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजुला भावर व प्रा. अशोक निर्वळ तसेच इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.