Join us

Stamp Paper : बँकांकडून शंभर रुपयांच्या मुद्रांकास नकार; पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:22 AM

शासनाने शंभर, दोनशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची सक्ती केली आहे. त्याची अंमलबजावणी १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची एकाचवेळी राज्यातून मागणी वाढली आहे.

कोल्हापूर : शासनाच्या आदेशानुसार शंभर, दोनशे रुपयांच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी पाचशे रुपयांचा मुद्रांक द्यावा लागल्याने त्याची प्रचंड मागणी वाढली आहे. परिणामी, शहर आणि जिल्ह्यात ५०० रुपयांच्या मुद्रांकांची टंचाई आहे.

यासाठी मुद्रांक विक्रेत्यांकडे वशिला, जादा पैसे देऊन ते खरेदी करावी लागत आहेत. पाचशे रुपयांचे मुद्रांक मिळत नसल्याने शंभर रुपयांचे पाच घेतलेले मुद्रांक काही राष्ट्रीयीकृत बँका नाकारत आहेत. परिणामी, मुद्रांकांवर काम करून घेणाऱ्यांची कोंडी होत आहे.

शासनाने शंभर, दोनशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची सक्ती केली आहे. त्याची अंमलबजावणी १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची एकाचवेळी राज्यातून मागणी वाढली आहे.

यामुळे येथील कोषागार कार्यालयात मुद्रांक विक्रेत्यांना मागेल तितके पाचशे रुपयांचे मुद्रांक मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. पन्नास मागितल्यानंतर २० दिले जात आहेत. परिणामी, मिळालेले पाचशे रुपयांचे मुद्रांक आपल्या नेहमीच्या ग्राहकांना आणि अधिक पैसे देणाऱ्यांना विकत आहेत.

परिणामी, पाचशे रुपयांचे मुद्रांक सहजपणे उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत मोठे कर्ज प्रकरण करण्यासाठी चार ते पाच प्रतिज्ञापत्र करावे लागत आहेत. त्यासाठी पाचशे रुपयांचे पाच मुद्रांक द्यावे लागत आहेत.

पण, पाचशे रुपयांचे मुद्रांक न मिळाल्याने शंभर रुपयांचे पाच मुद्रांक एकत्र करून देण्याचा पर्याय ग्राहक निवडत आहेत. पण, अनेक राष्ट्रीयीकृत बँकांकडून शंभर, २०० रुपयांचे मुद्रांक बंद केले आहेत.

त्यामुळे पाचशे रुपयांचेच हवेत अशी सक्ती केली जात आहे. परिणामी, पाचशे रुपयांचे मुद्रांक मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. प्रसंगी किती पैसे घ्यायचे ते घ्या पण पाचशे रुपयांचे मुद्रांक द्या, अशी मानसिकता काही जणांची आहे.

कायदेशीरदृष्ट्या घ्यायला हवे• तिजोरीत अधिकचे पैसे येण्यासाठी शासनाने कोणत्याही कामासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक बंधनकारक केले आहे.• शंभर रुपयांचे पाच मुद्रांक घेतले तरी शासनाच्या तिजोरीत पाचशे रुपये जातात. यामुळे पाचशे रुपयांचा एकच मुद्रांक आणा, अशी सक्ती करणे चुकीचे आहे.• शंभरऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांक हवे असे शासनाने म्हटले आहे. याचा अर्थ शंभरचे पाच घेतले तरी ते कायदेशीर आहेत, असे कोषागार प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाच मुद्रांकावर करावे लागते प्रिंट पूर्वी मुद्रांकावर हस्तलिखित होते. आता संगणकावर टाईप करून ते मुद्रांकावर घेऊन त्यांची प्रिंट काढली जाते. शंभर रुपयांचे पाच असतील तर पाचवर प्रिंट करताना त्यांना कसरत करावी लागत आहे.

राष्ट्रीय बँकेत कर्जासाठी पाचशे रुपयांचे पाच मुद्रांक मागितले आहेत. आठ दिवसांपासून ते खरेदी करण्यासाठी शहरातील विविध विक्रेत्यांकडे हेलपाटे मारले. पण, मुद्रांक विक्रेते शंभर रुपयांचे पाच घ्या, असा सल्ला देत आहेत. याउलट बँका पाचशे रुपयांचा एक असे पाच मुद्रांक आणा, असा आग्रह करीत आहेत. - अजित सूर्यवंशी, व्यावसायिक, पेठवडगाव

टॅग्स :सरकारराज्य सरकारबँककोल्हापूर