इब्राहीम जहागिरदार
कुरुंदा : हक्काच्या साखर कारखान्याला घरघर लागल्याने ऊस द्यावा कोठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. तसेच ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना बेजार होण्याची वेळ आली होती. काहींनी जवळच्या कारखान्याला तर काहींनी गूळ कारखान्याला ऊस दिला. आजमितीस काही प्रमाणात शिल्लक आहे. एकंदर ऊस कारखान्याला देण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे.कुरुंदा येथील टोकाई सहकारी साखर कारखाना यंदा अडचणीत आल्यामुळे ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा, यासाठी दमछाक होऊ लागली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस टोकाईला न देता इतरत्र कारखान्याला क्रमवारीनुसार पसंती देण्यात येत आहे. सद्यस्थितीत बाहेरच्या कारखान्याने ऊस मोठ्या प्रमाणावर नेला आहे. हक्काचा कारखाना नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस गूळ कारखान्याकडे वळविला आहे.
त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना ऊस तोडणीकरिता कसरत करावी लागली आहे. ऊस नेण्यासाठी हक्काच्या कारखान्याला घरघर लागल्याने दुसरा कारखाना किंवा गुळाच्या गूळ कारखान्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जवळपास उसाचा गाळप संपला आहे. या परिस्थितीत आता ऊस कोणीच नेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गुळाच्या कारखान्याला ऊस द्यावा लागत आहे. सद्यस्थितीत काही प्रमाणात तुरळक ठिकाणी ऊस शिल्लक असून, तो आता शेतकरी गुळाच्या कारखान्याला देत आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणावर गुळाच्या कारखान्याला ऊस दिला गेला. कमी भावात नाईलाजाने शेतकऱ्यांना गुळाच्या कारखान्याचा शोध घ्यावा लागला आहे.
बिलासाठी होऊ लागली शेतकऱ्यांची फजिती...
कुरुंदा येथील टोकाई साखर कारखान्याने गतवर्षी उसाचे बिल देण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच फजिती केली. त्यामुळे कारखान्यावरील असलेला विश्वास शेतकऱ्यांतून उडाला. यंदा शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला दिला नाही. केवळ २४ हजार मे. टन गाळप झाला आहे. त्याही सर्व शेतकऱ्यांना बिल मिळाले नाही. परिणामी कारखाना अडचणीत आला. आजघडीला टोकाई साखर कारखाना संकटात अडकला असल्याचे बोलले जात आहे.
गूळ कारखान्याला ऊस दिला
आजमितीस ऊस काही शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. ऊस घरी ठेवून काय उपयोग म्हणून आम्ही गूळ कारखान्याला देऊन पैसे उभे करत आहोत. दोन पैसे पदरात पडले तर कुटुंबाला आधार होतो. - अशोक दळवी, शेतकरी
कारखाने स्वतःहून ऊस नेत नसतील तर ऊस गूळ कारखान्याला दिलेला बरा. कुरुंदाजवळ कारखाना आहे. परंतु तो बंद आहे. मग आम्ही गूळ कारखान्याला ऊस दिला आहे. - ज्ञानेश्वर गुळगुळे, शेतकरी