रावसाहेब उगले
नाशिक : निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत जिद्दी बळीराजाने पिकविलेल्या गोड आणि मधाळ निर्यातक्षम द्राक्षाला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी १२७ रुपये किलो अर्थात १२ हजार ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील मॅग्नस फार्म फ्रेशमधून गुरुवारी (दि.९) पहिला कंटेनर रशियाला रवाना झाला.
जगाच्या पाठीवर निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात नाशिकची ओळख आहे. परकीय चलन मिळवून देण्यात द्राक्ष पिकाचा मोलाचा वाटा आहे. अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत नाशिकचा बळीराजा युरोपियन देशांसह रशिया, दुबई, चीन आदी देशांमध्ये निर्यातक्षम द्राक्ष पुरवतो. यावर्षी तर दुष्काळी परिस्थितीचा सामना करून शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकवली. गुरुवारी बागलाण तालुक्यातील वनोली येथील शेतकरी किशोर (आबा) खैरनार यांची १८० क्विंटल द्राक्ष मॅग्नस फार्म फ्रेशमधून कंटेनरद्वारे रशियाला रवाना झाली. थाॅमसन जातीच्या वाणाला १२७ रुपये किलोचा दर मिळाला. मॅग्नस फार्म फ्रेशचे संचालक लक्ष्मण सावळकर व गिरीश सारडा यांच्या हस्ते दिवाळीच्या पहिल्या दिवशी कंटेनरचे पूजन करण्यात आले.
यावेळी कंपनीचे कर्मचारी महेंद्र धुमाळ, गणेश आवारे, दीपक तांबट, विकास आवारे, शेतकरी शशिकांत गाडे, दीपक नवले, आबा भालेराव, निवृत्ती मेधने, समाधान जाधव, रितेश शिंदे, अमर तोडकर, बाळासाहेब घडोजे, भाऊसाहेब उगले, संदीप गटकळ, विक्रम ताकाटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या ३ वर्षापासून द्राक्षाची निर्यात करते. परिसरातील शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कॅलिफोर्नियामध्ये पाऊस झाल्यामुळे भारतीय द्राक्षांना चांगली मागणी आहे. आगामी पंधरा दिवसांत युरोपियन देशांमध्येही निर्यात सुरु होईल. - लक्ष्मण सावळकर, संचालक, मॅग्नस फार्म फ्रेश