बदलत्या काळानुसार कृषी क्षेत्रातही मोठे बदल होऊन, शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अंगिकार करून पीक घेण्यास सुरुवात केली आहे. पेरणी व पीक काढण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होत असला तरी अजूनही शेतकऱ्यांनी जुन्या काळापासून सुरू असलेल्या प्रथा-परंपरांना फाटा दिलेला नाही. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बागायती पट्टा अशी ओळख असलेल्या उमरा परिसरात केळीचे पीक काढणीला आले असून, शेतकऱ्यांनी केळीच्या घडांची खणा-नारळाने ओटी भरून घड उतरविण्यास प्रारंभ केल्याचे चित्र दिसून येत आहे.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला अकोला जिल्ह्यातील उमरा परिसर हा बारमाही बागायती क्षेत्र म्हणून ओळखला जातो. मध्यंतरी पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे बागायती क्षेत्रावर परिणाम झाला होता; परंतु आता सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी झालेल्या धरणामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूर्वीसारखेच उमरा परिसरात बागायती क्षेत्र वाढले. त्यामध्ये कपाशी, लिंबू, संत्रा, पपई, पानपिंपरी व केळीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. या भागातील शेतकरी केळी पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात. पाण्याच्या उपलब्धतेमुळे केळी क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. गत काही दिवसांपासून केळीच्या काढणीला सुरुवात झाली आहे.
शेतकरी म्हणाले की...
खारपाणपट्ट्यातील शेतकरी ज्याप्रमाणे सीतादही करून कापसाच्या वेचणीला प्रारंभ करतात, त्याचप्रमाणे उमरा परिसरातील शेतकरी केळीच्या घडांना खणा-नारळाची ओटी भरून घड उतरवीत असल्याचे दिसून येत आहे. आमचे पूर्वज पिकांची पूजा करीत होते. आजही ग्रामीण भागातील शेतकरी कपाशीची जशी सीतादही करतात त्याचप्रमाणे केळीची नववधूप्रमाणे खणा- नारळाणे ओटी भरून घळ कटाईला सुरवात करतात. पूर्वजांची परंपरा आम्ही जोपासत असल्याचे शेतकरी गजानन झुणे यांनी सांगितले. तसेच उमरा येथील शेतकरी वसंतराव येऊल म्हणाले की, पूर्वी आम्ही केळीचे उत्पादन घेत होतो. मध्यंतरी पाण्याच्या कमतरतेमुळे केळी पीक बंद केले होते. आता धरणामुळे पाण्याची पातळी वाढल्याने आम्ही मागील दोन वर्षांपासून केळीचे उत्पादन घेत आहोत, असे ते म्हणाले.