मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने १५ वर्षांपासून किसान कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने, स्वर्गीय कृषिरत्न गणेशराव बेद्रे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदा २० ते २४ डिसेंबरदरम्यान गेवराईतील दसरा मैदानावर ८ एकरात ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरणार आहे, अशी माहिती आयोजन कृषिभूषण महेश बेदरे यांनी दिली.
कृषी प्रदर्शनात आत्माचे प्रकल्प संचालक, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, महाएपीएसी फेडरेशन यांचा सहभाग असणार आहे. प्रदर्शनात २०० कृषी उत्पादनांचे स्टॉल भरणार आहेत. एक दिवसीय पशुप्रदर्शन तज्ज्ञांची चर्चासत्रे प्रदर्शनात होणार आहेत. समारोपप्रसंगी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रदर्शनाचा गेवराई शहरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी मोटे, राजेंद्र आतकरे, शिनू बेदरे, धनंजय बेदरे, सचिन मोटे, राजेंद्र मोटे, भागवत जाधव, शिवाजी शिंगाडे, बाळासाहेब आतकरे आदींनी केले आहे.
आता शेतकरी बसणार हेलिकॉप्टरमध्ये
कृषी प्रदर्शनात यंदा शेतकयांसाठी अल्प दरात हेलिकॉप्टर राईडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.