State Level Vasundhara Award :
राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानामध्ये विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी जिल्हा परिषद म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने बहुमान पटकावला आहे.
या स्पर्धेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात विभागस्तरावर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारच्या पर्यावरण वातावरणीय बदल विभागातर्फे पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित 'माझी वसुंधरा अभियान' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येते.
माझी वसुंधरा अभियान ४.०' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. त्यात राज्यातील ४९४ नागरी स्थानिक संस्था, २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशा एकूण २२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता.
छत्रपती संभाजीनगर विभागात यांना मिळाला पुरस्कार
या अभियानात विभागस्तरावर अडीच हजार ते ५ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींपैकी जरंडी (ता. सोयगाव) ग्रामपंचायतीने ५० लाख, तर कुंभेफळ (ता. छत्रपती संभाजीनगर), दादेगाव जहागीर (पैठण) तसेच दीड हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींपैकी विभागस्तरावर सावखेड खंडाळा (ता. वैजापूर) ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १५ लाखांचे पुरस्कार पटकावले आहेत.
याबद्दल पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी या ग्रामपंचायतींच्या विशेष आढावा बैठका घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. याशिवाय सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा आणि तालुका व्यवस्थापक, केंद्रचालकांनीही प्रतिसाद देत भरीव कामगिरी केली. पुढील वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार पटकावण्याचा आमचा मानस आहे.
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागात नांदेड जिल्ह्यात असलेल्या कंधार तालुक्यातील शिरढोण या ग्रामपंचायतीला शासनाकडून माझी वसुंधरा ४.० हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिरढोण ग्रामपंचायतीने मराठवाडा विभागात अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला.
शासनाकडून मिळणाऱ्या ५० लाख रुपयांच्या बक्षिसातून हे गाव आता अधिक विकसित होणार आहे. शिरढोणपाठोपाठ जालना जिल्ह्यातील नेर, तर धाराशिव जिल्ह्यातील कोंड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुक्रमे ४०, ७५ आणि ८३ असे गुणानुक्रम या ग्रामपंचायतीला मिळाले.
राज्य शासनाकडून १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत संपूर्ण राज्यभर माझी वसुंधरा ४.० अभियान राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४१४ नागरिक स्थानिक संस्था व २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशा एकूण २२ हजार ६३२ संस्थांनी सहभाग घेतला होता.
ग्रामपंचायतने मागील वर्षी राबविलेल्या अभियानाचे डेस्कटॉप व फिल्ड मूल्यमापन हे त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे 'माझी वसुंधरा अभियान ४.०' मधील लोकसंख्यानिहाय १२ गटांतील विजेत्यांची निवड यामध्ये करण्यात आली आहे.
त्यात नांदेड जिल्ह्याने बाजी मारत राज्यातील सहा विभागांपैकी एक असलेल्या मराठवाडा विभागात अव्वल येऊन नावलौकिक केले. यामध्ये बक्षिसांची रक्कम ही दोन टप्प्यात दिली जाईल. ५० टक्क्यांचा पहिला टप्पा हा तत्काळ, तर दुसरा टप्पा हा प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर देण्यात येईल.
मागील वर्षी नांदेड जिल्ह्यातील १२९९ ग्रामपंचायती यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यंदा शासनाने सर्वच ग्रामपंचायतीला हे अभियान राबविण्याचे सक्तीचे केले आहे.
चार न.पं.चा समावेश
शिरढोण ग्रामपंचायतीसोबतच जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषद, कंधार नगरपरिषद, नायगाव व माहूर नगरपंचायतीला देखील ५० लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.
पंचतत्त्वावर आधारित
• माझी वसुंधरा हा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्त्वांवर आधारित उपक्रम आहे. हे अभियान २ ऑक्टोबर २०२० रोजी पर्यावरण विभागाने सुरू केले. भारतातील हा पहिला एकात्मिक उपक्रम आहे, जो निसर्गाच्या पंचमहाभूतातील पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो.
• वसुंधरा (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश आहे. वातावरणीय बदलाची माहिती करून देणे, हा अभियानाचा उद्देश आहे. महाराष्ट्राचा शाश्वत विकास सुनिश्चित करणे आणि राज्यस्तरावर ठोस वातावरणीय कृती करणे हेदेखील त्याचे उद्दिष्ट आहे.
• या अभियानातून राज्याला वातावरणीय बदलाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विविध उपाययोजना हाती घेण्यातही मदत होईल.
बक्षिसाच्या रकमेचा विनियोग
• या अभियानात मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेचा विनियोग हा पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी उपाययोजनांवर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.
• अर्थात बक्षिसांची ५० टक्के रक्कम ही हरितक्षेत्र वाढविण्यासाठी, तर उर्वरित ५० टक्के रक्कम ही पर्यावरणपूरक इतर उपाययोजनांसाठी वापरणे अनिवार्य आहे.