अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडीचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा, याकरिता कोकणातीलआंबा पिकासाठी कृती दलाची निर्मिती करण्यात आली. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करण्याची मुख्य जबाबदारी टास्क फोर्सची असेल. आठ सदस्यीय समितीत दापोली कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश आहे. यासाठी कोकणातील शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील अधिकाऱ्यांबरोबरच तत्काळ बैठक घेत 'कृती दल' स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समितीमुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. द्राक्ष, ऊस पिकाच्या संरक्षणासाठी कृती दल आहे. मात्र, कोकणातील आंबा पिकासाठी आतापर्यंत असे कृती दल कार्यान्वित नव्हते. कोकणात सातत्याने आंबा पिकावर संकट येत आहे. त्यामुळे आंबा पीक घ्यावे की नाही, या विवंचनेत जिल्ह्यातील आंबा उत्पादक आहे.
अधिक वाचा: आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणासाठी कृती दलाची स्थापना
जिल्ह्यात घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेला पूर्वपट्टा व समुद्रकिनाऱ्यालगतचा पश्चिमपट्टा असे दोन भाग पडतात. फेब्रुवारी, मार्चपर्यंत किनारपट्टीचे श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड, अलिबाग या समुद्रीपट्ट्यात आणि नजीकच्या भागात आंबा पीक येते; तर पूर्व पट्ट्यातील महाड, पोलादपूर, सुधागड-पाली, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये आंबा लागवड होते.
'सद्यस्थितीतील फळांचा भरोसा नाही'- सध्या झाडांवर वरकरणी फळे दिसत असली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे बागायतदार सांगतात. पूर्व पट्ट्याच्या तुलनेत पश्चिम पट्ट्यात अद्याप अवकाळीचे प्रमाण कमीच होते.- त्यामुळे जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, सुधागड-पाली, कर्जत या पूर्व पट्ट्यातील तालुक्यात आंबा उत्पादन घ्यावे की घेऊ नये, असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. अशा येणाऱ्या संकटांमधून मार्गदर्शन करण्यासाठी कृती दलामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
फलोत्पादन योजनेअंतर्गत आम्ही आंबा लागवड केली. काही वर्षे आंबा लागवडीतून उत्पादनही चांगले मिळाले; परंतु काही वर्षांपासून आंब्यावर लहरी वातावरणाचा मोठा परिणाम होत आहे. या वर्षीही अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे शेंडी पोखरणारी अळी, उंट अळी, फुले खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. जो मोहोर आहे, त्यातील फळधारणा होईल, याबद्दल शेतकरी साशंक आहेत. - जगन्नाथ पाटील, आंबा उत्पादक शेतकरी
कृती दल संपूर्ण कोकणात कार्यरत आहे. वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांवर सखोल संशोधन करून ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. यापूर्वी अशी व्यवस्था नव्हती. परंतु, काही वर्षापासून आंबा पिकावर येणाऱ्या संकटांचा विचार करून अशी व्यवस्था असावी, अशी मागणी केली जात होती. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी टास्क फोर्सचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. - उज्ज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधीक्षक