Storage Facility : नीलेश जोशी :
बुलढाणा जिल्ह्यात दोन तृतीयांश अर्थकारण कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, परंतू कृषीवर आधारित अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने अन्नधान्य साठवणुकीच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात धान्याची विक्री करावी लागते. त्यामुळे जिल्ह्यात गोदाम व कोल्ड स्टोअरेजची साखळी निर्माण होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात उत्पादनाच्या तुलनेत वर्तमान स्थितीत केवळ २८ टक्केच कृषी उत्पादनांची साठवणूक करण्याची क्षमता आहे. त्याअनुषंगाने गोदाम व कोल्ड स्टोअरेजला उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे. बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अन्नधान्य साठवणूक क्षमता वाढविल्यास शेतकऱ्यांना धान्याची सुरक्षित साठवणूक करण्यासोबतच ते तारण ठेवून अर्थकारण वाढविण्यावरही भर देता येऊ शकतो.
बुलढाणा जिल्ह्यात २०२१-२२ दरम्यान अन्नधान्य, तेलबिया, डाळींसह अन्य कृषिमालाचे १३ लाख ६७ हजार ३४५ मेट्रिक टन उत्पादन झाले होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात जिल्ह्यात ३३७ गोदामांमध्ये३ लाख ५१ हजार ६६२ मेट्रिक टन अन्नधान्य साठविण्याची क्षमता आहे. त्यामुळे कृषी व कृषी संलग्न व्यवसायात जिल्ह्यात पतपुरवठा वाढविल्यास पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत मिळेल. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना मुंबई व नागपूरमध्ये नाशवंत शेतीमाल पाठविणे सोयीचे झाले आहे. परंतु या मार्गावर अद्याप अपेक्षित अशी गोदाम व कोल्ड स्टोअरेजची साखळी उभी राहिली नाही. त्यामुळे त्यावर जोर देण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील गोदाम व साठवणूक क्षमता
बाजार समितीचे गोदाम १०७
साठवणूक क्षमता २९६४० मे.टन
खरेदी-विक्री संघांचे गोदाम ३७
साठवणूक क्षमता १२३५० मे.टन
खासगी व अन्य संस्थांचे गोदाम १९३
साठवणूक क्षमता २५३१२६ मे.टन
३०५० मेट्रिक टन क्षमता वाढविणार
जिल्ह्यातील ही अपुरी सुविधा पाहता चालू आर्थिक वर्षात गोदाम व कोल्ड स्टोअरेजमध्ये जिल्ह्यातील बँकांकडून ३८ कोटी रुपयांचा पतपुरवठा करत २२१ गोदाम उभारणीचे पतआराखड्यात नियोजन केले आहे.
बाजार समित्यांचीही साठवण क्षमता कमी■ जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वर्षाकाठी ५ हजार कोटींचे आर्थिक व्यवहार होत असले तरी १३ बाजार समित्या आणि २३ उपबाजार समित्या मिळून १०७ गोदामांची क्षमता ही २९ हजार ६४० मेट्रिक टन धान्य साठविण्याची आहे.■ खरेदी विक्री संघाच्या ३७ गोदामांची क्षमता ही १२ हजार ३५० मेट्रिक टन आहे तर खासगी व अन्य संस्थांच्या १९३ गोदामांची २ लाख ५३ हजार १२६ मेट्रिक टन साठवणूक करण्याची क्षमता आहे.