अरुण बारसकरसोलापूर : उन्हाचा तडाखा सुरू होताच हंगाम संपवून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात १०५ हून अधिक साखर कारखाने बंद झाले असून, यंदाही ऊस गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
पाऊस कमी पडल्याने पाण्याची अडचण असतानाही कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सोलापूरचे गाळप अधिक झाले आहे. राज्यात यंदा पाऊस कमी पडल्याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसल्याने ऊस पिकावरही परिणाम होईल, असा अंदाज साखर कारखाने व साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला होता.
गाळप हंगाम कमी होईल, असा अंदाज असल्यानेच यंदा नोव्हेंबर महिन्यात ऊस गाळपाला राज्य शासनाने परवानगी दिली होती. राज्यभरातील बहुतेक साखर कारखान्यांकडे पुरेशी ऊस तोडणी यंत्रणा नसल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने चालले नाहीत. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांचा हंगाम लांबल्याचे सांगण्यात आले.
यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर साखर कारखाने बंद होण्यास सुरूवात झाली. आज शंभरहून अधिक साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. कडक उन्हाचे चटके बसू लागल्यानेही गाळप हंगाम आटोपला जात आहे. दुष्काळी परिस्थितीतही सोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
कोल्हापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या तक्त्यावरून दिसत आहे. असे असले तरी सोलापूर जिल्ह्यात तीन- चार साखर कारखाने सुरू असून, ते मार्चपर्यंत चालतील, असे सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील १०-१२ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.
आतापर्यंत १० कोटी मेट्रिक टन गाळप- यंदा राज्यात २०७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. आतापर्यंत १० कोटी २३ लाख मेट्रिक टन गाळप झाले असून, १० कोटी ४० लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.- सोलापूर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ५९ लाख मेट्रिक टन झाले असून, कोल्हापूरचे गाळप एक कोटी ४८ लाख मेट्रिक टन झाले आहे.- पुणे व अहमदनगर जिल्ह्यांचे गाळप प्रत्येकी एक कोटी २२ लाख मेट्रिक टन तर सातारा जिल्ह्याचे गाळप एक कोटी ३ लाख मेट्रिक टन झाले आहे.
बारामती अॅग्रोचे उच्चांकी गाळपयंदा इंदापूर तालुक्यातील बारामती अॅग्रोचे गाळप २२ लाख मेट्रिक टनपर्यंत गेले असून, अद्याप कारखाना सुरू आहे. दौंड शुगरचे ऊस गाळप १७ लाख ३० हजार तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदेचे गाळप १७ लाख १६ हजार मेट्रिक टन झाले आहे.