तामलवाडी :
तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) येथील जि.प. शाळेने शाळेच्या परिसरातच भाजीपाला पिकविला असून, यामुळे १२७ विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात दररोज सकस, तोही सेंद्रिय पद्धतीने उत्पादित झालेला भाजीपाला उपलब्ध होत आहे.
शाळेला जागा कमी असली तरी आहे त्या उपलब्ध जागेत वर्ग खोल्यासमोर परस बाग तयार करण्यात आली आहे. यात टोमॅटो, भेंडी, कारले, चुका, आळू, मिरची आदी विविध भाजीपाला सेंद्रिय पद्धतीचा वापर करून उत्पादित केला जात आहे.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक कल्याण बेताळे, जोतिबा जाधव, अमोल कविटकर, शारदा महिंद्रकर, रोहिणी कापसे, सोनाली काकुस्ते, गायत्री जोशी, पोषण आहार स्वयंपाकी महिला कुसुम माळी आदींनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायतीनेही दिल्या सुविधा
सांगवी (काठी) शाळेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मैदानात पेव्हर ब्लॉक बसवून देण्यात आले. तसेच लोकवाट्यातून शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी १ हजार लिटर क्षमतेची जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सुविधा पुरविण्यासाठी सरपंच अमोल पाटील, उपसरपंच रामदास मगर, ग्रामसेवक बापूसाहेब दराडे, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष विश्वास मगर आदींनी पुढाकार घेतला आहे.
विद्यार्थ्यांना भाजीपाल्याचा बोनस
पोषण आहारात भात शिजवणाऱ्या महिलेकडून मेन्यूप्रमाणे आहारामध्ये भाजीपाल्याचा समावेश करून पुरवठा केला जातो. परसबागेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याचा वापर बोनस म्हणून विद्यार्थ्यांच्या आहारात दिला जात आहे. सकस भाजीपाला पोषण आहारात मिळू लागल्याने विद्यार्थी व पालकात समाधान व्यक्त केले जात आहे.
शिक्षक विद्यार्थी यांच्या प्रयत्नातून परसबागेत लागवड केलेला भाजीपाला दररोज पोषण आहारात वापरला जात आहे. १२७ विद्यार्थी याचा लाभ घेत असून, यातून त्यांना सकस आहार उपलब्ध होत आहे. - कल्याण बेताळे, मुख्याध्यापक