हरभरा हे रब्बी हंगामातील व्यवस्थापनास प्रतिसाद देणारे असे कडधान्याचे पीक असून भरघोस उत्पादनाबरोबरच चांगला बाजारभाव मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या ही अतिशय फायदेशीर असे हे पीक आहे. हरभऱ्यासाठी पीक व्यवस्थापन करताना पेरणीची योग्य वेळ, बीज प्रक्रिया, सुधारित जातींचा वापर, सुधारित लागवड+आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर आणि पीक पोषण व दाण्याचे वजन वाढीसाठी अन्नद्रव्यांची फवारणी या पंचसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असते. अर्थातच याबरोबर शिफारस केलेली खते व पीक संरक्षण याचा वापरही करणे गरजेचे आहे.
२५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर ही हरभरा लागवडीची योग्य वेळ आहे. या कालावधीनंतर नोव्हेंबर महिन्यात पेरणी केल्यास प्रत्येक आठवड्यात १ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन घटते तसेच डिसेंबर महिन्यातील पेरणीमुळे उशीर झालेल्या प्रत्येक आठवड्यात हेक्टरी २ क्विंटल उत्पादन कमी मिळते. त्याचप्रमाणे २५ ऑक्टोबरच्या पूर्वीही हरभरा पेरणीची घाई केल्यास अगोदरच्या प्रत्येक आठवड्यामागे हेक्टरी २ क्विंटल उत्पादन घटते. पेरणीसाठी घरचे अथवा विकतचे बियाणे वापरताना बियाणास पेरणीपूर्वी ७ ते १० ग्रॅम प्रति किलो ह्या प्रमाणात ट्रायकोडर्मा व ५ ग्रॅम रायझोबियम प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी. उपलब्धतेनुसार ५ ग्रॅम पीएसबी (फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया) प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
अधिक वाचा: हरभरा पिकाचे सुधारित वाण कोणते?
जास्त पाणी दिले गेल्याने किंवा पीक उभे असताना जास्त दिवस जमिनीत ओल राहिल्यास हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात मर होते. हे टाळण्यासाठी हरभरा पिकाची लागवड सरी-वरंबा पद्धतीवर करावी. त्यासाठी शेतात सरसकट ३ फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बगलेस सुमारे ७ ते ८ सें.मी. अंतरावर वरंब्याच्या मध्यावर हरभऱ्याची टोकन पद्धतीने लागवड करावी. सरी-वरंबा लागवड पद्धतीत हरभरा पीक लागवड केलेल्या उंचीपर्यंत पाणी द्यावे आणि ज्यांच्याकडे तुषार सिंचन संच असेल त्यांनी सरी-वरंबा पद्धतीवर तसेच नेहमीच्या पद्धतीने लागवड केलेल्या हरभरा पिकास तुषारने आवर्जून पाणी द्यावे. पुढच्या भागात हरभऱ्याच्या सुधारित जाती व खत व्यवस्थापनाबाबत माहिती जाणून घेऊत.
डॉ. कल्याण देवळाणकर