Join us

Sugarcane Production : पावसाने ऊसाला मिळाली संजीवनी; यंदा राज्यात कोटी मेट्रिक टन ऊस उत्पादन वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 1:53 PM

जून-जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली असून राज्यात अगोदरच्या अंदाजापेक्षा एक कोटीहून अधिक मेट्रिक टन ऊस वाढण्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे.

अरुण बारसकर

सोलापूर : जून-जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली असून राज्यात अगोदरच्या अंदाजापेक्षा एक कोटीहून अधिक मेट्रिक टन ऊस वाढण्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. असे असले तरी पाऊस चांगला झाल्याने नव्याने लागवडीसाठी अधिक ऊस तोडणी होण्याचाही अंदाज व्यक्त करीत येत्या गाळप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी झालेल्या गाळपापेक्षा १७२ लाख मेट्रिक टन गाळप कमी होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका जसा इतर पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला तसा ऊस क्षेत्रालाही बसला होता. पाऊस कमी पडल्याने साखर कारखान्यांनी ऊस तोडणी पुरेशी यंत्रणा भरली नव्हती.

मात्र डिसेंबर-जानेवारीत अवकाळी पाऊस चांगला पडल्याने उसाच्या वजनात वाढ होण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे मागील वर्षीचा गाळप हंगाम काही अंशी वाढला होता; मात्र पाऊस कमी पडल्यानेच नवीन ऊस लागवड करण्यासाठी ऊस तुटला नव्हता. काही अंशी ऊस गूळ, रसवंती व वैरणीसाठी गेला होता.

यावर्षी जून महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. जवळपास चार महिने उसासाठी पोषक पाऊस पडत असल्याने वाढ चांगली होत आहे. धरण, तलाव, बंधारे, ओढे, नाले भरून वाहत असल्याने मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन ऊस लागवडीवर भर दिला आहे. राज्यात येत्या जानेवारीपर्यंत नवीन ऊस लागवड सुरू राहील असे सांगण्यात येते. राज्यात ज्या ज्या जिल्ह्यात मोठी धरणे व तलाव ओसंडून वाहत आहेत अशा भागात शेतकऱ्यांचा ऊस लागवडीवर भर आहे.

जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे राज्यात १०० लाख (एक कोटी) मेटिक टन ऊसवाढेल असा अंदाज आहे; मात्र पाण्याअभावी कमी झालेल्या ऊस क्षेत्रात आता नव्याने ऊस लागवड होत असल्याने बेण्यासाठी बराचसा ऊस तुटणार आहे. बेणे, गूळ व रसवंतीसाठी १० टक्के ऊस तुटेल असे गृहीत धरून गाळप हंगामाचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कृषी खात्याकडील नोंदीवरून राज्यात ११.६७ लाख हेक्टर ऊस क्षेत्र आहे.

साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज

■ अगोदरच्या अंदाजानुसार राज्यात ९०० लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस उपलब्ध होईल असे सांगण्यात येत होते. आता मंत्री समितीच्या बैठकीसाठीच्या बुकलेटमध्ये १००४ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल असे नमूद केले आहे. त्यातील बेण्यासाठी १०० लाख मेट्रिक टन तुटेल व प्रत्यक्ष कारखान्यांना ९०४ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे.

■ सरासरी ११:३० टक्के उतारा पडेल व १०२ लाख मेट्रिक टन साखर तयार होईल मात्र त्यातील १२ लाख मेट्रिक टन साखर इथेनॉलसाठी वर्ग होईल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे.

■ सरासरी हेक्टरी ८० ते ८६ मेट्रिक टन वजन होईल. मागील वर्षी १०७६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. यंदा त्यात मोठी घट होऊन ९०४ मेट्रिक टन गाळप होईल म्हणजे मागील वर्षापेक्षा १७२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप कमी होण्याचा अंदाज आहे.

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतीशेतकरीपाऊससोलापूरशेती क्षेत्र